मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : राज्यात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. दुसरीकडे धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालाय. धनगर समाजाच्या नेत्यांनी 21 दिवस उपोषण केलं होतं. त्यानंतर सरकारकडून धनगर समाजाला मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. धनगर समाजाने त्यासाठी सरकारला 50 दिवसांचा कालावधी दिला होता. ही मुदत संपल्याची माहिती धनगर समाजाच्या नेत्यांनी दिलीय. तसेच धनगर समाजाचे नेते आता पुन्हा उद्यापासून चौंडी येथे उपोषणाला बसणार आहेत. याशिवाय धनगर समाजाकडून राज्यभरात 20 ठिकाणी आमरण उपोषणाला आणि अनेक गावांमध्ये साखळी उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे.
धनगर समाजाचे नेते आणि यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोलतले यांनी याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली. “धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी उद्यापासून पुन्हा चौंडीत आमरण उपोषण केलं जाईल. सरकारला दिलेली 50 दिवसांची मुदत संपली आहे. राज्य सरकारकडून धनगर समाजाची क्रूर थट्टा केली गेली. राज्य सरकारने 21 दिवसांच्या उपोषणानंतर 50 दिवसांचा अवधी मागितला. मात्र काहीच केलं नाही. 50 दिवसात आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. सरकारने शब्द देऊनही अद्याप अभ्यास समिती देखील नेमली नाही”, असं बाळासाहेब दोलतले म्हणाले.
“यशवंत सेना उद्या 16 तारखेपासून पुन्हा चौंडीत उपोषण आंदोलन सुरू करणार”, असं बाळासाहेब दोललते यांनी सांगितलं. “राज्यात 20 ठिकाणी आमरण उपोषण आणि अनेक गावांमध्ये साखळी उपोषण करण्यात येईल. तर अंबड येथील ओबीसी मेळावा होत आहे. त्या मेळाव्याकडे धनगर समाज लक्ष ठेऊन आहे. मेळाव्यात धनगर अरक्षणाबाबतबाबत सकारात्मक असेल तरच आम्हाला तुमच्यामध्ये गृहीत धरावं”, असं अशी भूमिका बाळासाहेब दोलतले यांनी मांडली.
धनगर समाजाच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बारामती बंदची घोषणा करण्यात आली आहे. धनगर समाजाकडून बारामती बंदची हाक दिली आहे. धनगर समाजाच्यावतीने तहसीलदारांना तसं निवेदनही देण्यात आलं आहे. धनगर उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने बारामती बंदची हाक देण्यात आली आहे.