धारावीत आज मोठा तणाव निर्माण झाला होता. धारावीच्या 90 फीट रोडवर एक मशिद आहे. या मशिदीत अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आज मुंबई महापालिकेच पथक पोहोचलं, त्यावरुन तणाव निर्माण झाला. पालिकेने कारवाई करु नये, त्यांना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. पोलीस स्टेशनमध्ये पालिकेचे अधिकारी, आंदोलक आणि पोलिसांची एक बैठक झाली. त्यानुसार मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाई आठ दिवसांसाठी स्थगिती करण्यात आली आहे. पालिकेकडून आठ दिवस कोणतीही तोडक कारवाई होणार नाहीय.
आता या बाबतीत मशिदीच्या विश्वस्तांची भूमिका समोर आली आहे. पण त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. महानगरपालिकेने बजावलेल्या निष्कासन नोटीसनंतर विश्वस्तांनी केलेली लेखी विनंती प्रशासनाने मान्य केली आहे. धारावी येथील 90 फूट रस्त्यावरील अतिक्रमित मशिदीचे बांधकाम काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावली होती. तसेच या नोटीसीनुसार कारवाई हाती घेतली होती.
मशिदीच्या विश्वस्तांनी काय विनंती केली?
तथापि, सदर ठिकाणचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळ 2 चे उपआयुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेने काय म्हटलय?
संबंधितांनी स्वतःहून बांधकाम हटवण्याची लेखी विनंती केल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ही विनंती मान्य केली आहे. ठरल्या मुदतीत हे अतिक्रमित बांधकाम काढून टाकावे, असे निर्देशही विश्वस्तांना देण्यात आले आहेत, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
गोंधळाची स्थिती
दरम्यान पोलीस स्टेशनमधील बैठकीनंतर आंदोलकांच्या नेत्याने मशिदीच्या अनधिकृत भागावरील कारवाई रोखण्यासाठी कोर्टात जाणार असल्याच म्हटलं आहे. एकाबाजूला मशिदीचे विश्वस्त म्हणतायत की आम्ही अनिधकृत बांधकाम हटवू चार ते पाच दिवस द्या आणि दुसऱ्याबाजूला आंदोलक म्हणतात स्थगितीसाठी कोर्टात जाणार, त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे.