दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 14 मुंबई 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानी उद्योग समूहाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. ठाकरे गटाकडून या मोर्चासाठी तयारीदेखील केली जातेय. ठाकरे गटाकडून 16 डिसेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाने धारावी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. ठाकरे गटाने धारावी पोलिसांना परवानगीसाठी पत्र पाठवलं होतं. पण धारावी पोलिसांनी ठाकरे गटाची मागणी मान्य केलेली नाही. धारावी पोलिसांनी ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवा, असं ठाकरे पोलिसांनी म्हटलं आहे. धारावी पोलिसांच्या या सूचनेनंतर ठाकरे गटाने मुंबई पोलीस आयुक्तांकडे मोर्चासाठी अर्ज केला आहे.
धारावी पोलिसांनी मोर्चाला परवानगी देण्याबाबत स्पष्टपणे असमर्थता दर्शवली आहे. धारावी पोलिसांच्या या भूमिकेनंतर आता ठाकरे गटाची कोंडी होताना दिसत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. धारावी पोलीस ठाण्याचे उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला पोलीस आयुक्तांकडे अर्ज करा, असा सल्ला दिलाय. त्यानंतर ठाकरे गटाने पोलीस आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती ठाकरे गटाच्या मागणीवर काय भूमिका घेतात, मोर्चाला परवानगी देतात का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
धारावीतील झोपडपट्टी भागाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. झोपडपट्टीतील नागरिकांना बिल्डिंगमध्ये त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. धारावीच्या या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी अदानी उद्योग समूहास मिळाली आहे. या योजनेअंतर्गतच्या कामकाजात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. या प्रकल्पातून स्थानिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. त्यामुळे ठाकरे गटाकडून धारावीत मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सविस्तर भूमिका मांडली होती. “अनेक ठिकाणी पुनर्विकास करताना तिथल्या नागरिकांना 400 ते 500 चौरस फुटांची घरे दिली जातात. पण धारावीच्या नागरिकांना केवळ 300 चौरस फूट देऊ, असं सांगितलं जात आहे. धारावीधारकांना 400 ते 500 चौरस फुटांची घरे मिळायला हवीत. योग्य पद्धतीने सर्वेक्षण करावं, धारावीकरांना धाक दाखवून, दडपशाही किंवा दमदाटीच्या जोरावर सर्वेक्षण केलं तर शिवसेना हा कट हाणून पाडेल”, अशा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.