मुंबईत मागील महिन्यात एक धाडसी चोरी झाली होती. गोव्यात लग्नासाठी गेलेल्या कुटुंबातील व्यक्तीच्या घरी दोन कोटी रुपयांचे हिरे, सोने आणि रोकड रक्कम चोरी झाली होती. या चोरीचा तपास करण्याचा आव्हान मुंबई पोलिसांनी पेलले आहे. या प्रकरणात घरातील नोकर आणि इतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि टेक्निकल टीमच्या मदतीने उत्तर प्रदेशातून तीन जणांना अटक केली. आरोपींकडे रोकड आणि दागिने मिळाले आहेत.
चोरीच्या प्रकरणाची माहिती देताना मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या महिन्यात मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातून दागिने, हिरे आणि रोख 7 लाख रुपयांची चोरी झाली होती. घरमालक एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी कुटुंबासह गोव्याला गेले असताना ही घटना घडली. लग्न आटोपून घरमालकाने घरातील कपाट तपासले असता सुमारे दोन कोटी रुपयांचे हिरे आणि दागिने आणि सात लाख रुपयांची रोकड गायब होती. मालक लग्नास गेल्याची संधी साधत आरोपींनी ही चोरी केली.
कपाटातून दागिने व रोख रक्कम गायब झाल्याने घरमालकाला धक्काच बसला. त्यांनी या प्रकरणाची तत्काळ पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले आणि तांत्रिक पथकाच्या मदतीने दोन आरोपींना पकडले. हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
चोरी प्रकरणात निरंजन बहेलिया (वय 41), रामचेलवा माकू पासवान उर्फ गुटिया (वय 26 ) आणि ज्वेलर जयप्रकाश हरिशंकर रस्तोगी (वय 59 ) यांना अटक करण्यात आली आहे. जयप्रकाश हरिशंकर रस्तोगी याने आरोपींना चोरीचे दागिने विकण्यात मदत केली होती. याप्रकरणी पोलीस दुसऱ्या ज्वेलर्सच्या शोध घेत आहेत. गेल्या महिन्यात बहेलिया आणि पासवान हे त्या घरातील नोकर आहेत. त्यांनी त्यांच्या मालकाच्या घरातील बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटाचे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाले होते.