मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांचं आंदोलन सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी (mumbai police) या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या राजकीय नाट्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसाच म्हणायचा तर त्यांनी स्वत:च्या घरात म्हणावा. दुसऱ्यांच्या घरात जाण्याचं कारण काय? असा सवाल करतानाच कुणाची तरी सुपारी घेऊनच त्यांचा हा ड्रामा सुरू आहे. त्याशिवाय त्यांचं धाडसच होणार नाही. या मागचा कर्ताकरविता कोण आहे हे शोधलं जाईल, असा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ढासळणार नाही. पण या प्रकाराला फक्त राणा दाम्पत्य आणि त्यामागचे छुपे लोक जबाबदार असतील. राणा दाम्पत्याच्या मागे कोणी तरी असणार. कुणाची तरी सुपारी घेतलीय. कोण आहे. कोण नाही. परंतु कुणाच्या तरी सांगण्यावरून हे जाणूनबुजून चाललं आहे. ते स्वत:हून धाडस करणार नाहीत. पण
पोलीस आपली जबाबदारी पार पाडतील, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
पोलीस आपलं कर्तव्य करत आहेत. सैनिक आणि राणा कुटुंबीयांना आव्हान आहे की समजदारीची भूमिका घ्या. कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावी याची काळजी घ्या. त्यांना हनुमान चालिसा वाचायची असेल तर स्वत:च्या घरी वाचा. दुसऱ्याच्या घरी जाऊन अशा प्रकारे ड्रामा करण्याची गरज नाही. त्यांना फारच धर्माबद्दल आवड असेल, कशाबद्दल आवड असेल तर अमरावतीत त्यांच्या घरात शांततेत करावं. मातोश्रीत जाऊन विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढवून घेऊ नये. परिस्थिती तणावात येईल असा प्रयत्न अजिबात करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, कालपासूनच शिवसैनिक मातोश्रीवर ठाण मांडून आहेत. काल काही शिवसैनिकांनी रात्री नवनीत राणा यांच्या घराबाहेर जाऊन निदर्शने केली. रात्रभर शिवसैनिक राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर ठाण मांडून होते. तर काही शिवसैनिक मातोश्रीबाहेर जोरदार घोषणाबाजी करत राणा दाम्पत्यांचा निषेध नोंदवत होते.
संबंधित बातम्या: