मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्या, अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आलंय. दिपाली या आज संध्याकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या. दिपाली यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जवळपास अर्धा ते एक तास दिपाली सय्यद आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर दिपाली या वर्षा बंगल्याबाहेर दाखल झाल्या आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिंदे गटात सहभागी होण्याबाबतच्या चर्चांवर उघडपणे प्रतिक्रिया दिली नाही. पण एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज नसल्याची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली. “माझी कुणावरही नाराजी नाही. कुणी कुठे आलं आणि कुणी कुठली जागा घेतलीय त्याच्यामुळे मी नाराज आहे, असं काहीही नाही. प्रत्येकाची जागा प्रत्येकजण स्वत:च्या मेहनतीने स्थापन करतं. त्यामुळे माझी नाराजी नाही”, असं दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं.
“मी गेल्या दिवसांपासूनच्या राजकीय घडामोडींदरम्यान राजकारणात सक्रिय आहे. काही गोष्टी प्लॅनिंग करायच्या असतात. काही कामं करायची असतात. ती कामं टप्प्याटप्प्याने पूर्ण करायचे असतात. त्याला आपण वेळ द्यावा लागतो. त्या कृतीतूनच लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तेच मी करत आहे आणि ते लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. प्रत्येकाची वेगळ्या पद्धतीची इच्छा आहे. पण आपण जे काम करतो त्या कामाला एक स्थान मिळतं. ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला आपला नेता सपोर्ट करत असेल तर मला असं वाटतं की आपण त्यांच्याबरोबर जायला हवं”, असं सूचक विधान दिपाली सय्यद यांनी केलं.
“शिवसेनेत सुषमा अंधारे आल्या म्हणून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. पण तसं काही नाहीय. प्रत्येक जण आपापलं काम करत आहे. मला असं वाटतं की, मी जे करतेय ते आपल्या कामातून आणि कृतीतून लोकांसमोर येतंय. तेच मी करते”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘शिंदे-ठाकरे एकत्र यावेत अशी इच्छा’
“सत्ता संघर्ष सुरु असताना एकत्र आणण्याचे खूप प्रयत्न केले. पण मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल हे आपण सांगू शकत नाही. मी माझ्याकडून खूप प्रयत्न केले. असं घडावं अशी माझू खूप इच्छा होती. भविष्यातही शिंदे-ठाकरे एकत्र यावेत अशी इच्छा आहे. पण त्याला थोडा वेळ लागतो. त्याला आपण काय करु शकतो?”, असा प्रश्न दिपाली सय्यद यांनी उपस्थित केला.
‘…तर आज जे झालंय ते झालं नसतं’
“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्याला जात आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे की, त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या दौऱ्याला यश मिळो. हे दौरे त्यांनी आधीच सुरु केले असते, प्रत्येकाला त्याची जागा दिली असती, प्रत्येकाला सांगितलं असतं की, ही जागा घेऊन सुरुवात करा. आपल्या नेत्याला हे माहिती असलं पाहिजे की माझ्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी कितपत ताकदवार आहेत आणि काय करु शकतात. त्यांनी जर ती ऑर्डर दिली असती आणि कार्यकर्त्यांकडून करुन घेतलं असतं तर आज जे झालंय ते झालं नसतं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“माझा आवाज मातोश्रीपर्यंत पोहोचत नव्हता. आवाज रोखणारे अनेकजण होते. त्यांची नावे नक्कीच लवकर सांगेन. काय होतं, कसं होतं, तिथे असणारी किती लोकं होती, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागायची याबाबत नक्कीच सांगेन. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तितकी मेहनत घ्यावी लागली नाही”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.