मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देवून आदरांजली वाहिली. यावेळी शिंदे गटाचे अनेक नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन करुन गेल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर मोठा वाद निर्माण झाला. एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरुन गेल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात हे कार्यकर्ते तिथे आले. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आले. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.
“आमच्यासाठी उद्या फार महत्त्वाचा दिवस आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन आहे. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांचा उद्या स्मृतीदिन आहे. तो स्मृतीदिन आम्ही शांततेने श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे. बाकीचे तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणीही इथे विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विघ्न येऊ देणार नाहीत. तो दिवस नाही. संपूर्ण जग बघतंय”, अशी भूमिका अनिल देसाई यांनी मांडली.
“त्यांचं झालंय ना आता, त्यांना आता निघू द्या. आम्ही शांततेचं आवाहन केलं आहे. ज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व माहिती आहे, ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार माहिती आहेत ते कुणीही इथे अनर्थ करणार नाहीत”, असंही अनिल देसाई यावेळी म्हणाले. कोण कुणाला डिवचत नाही, असंही देसाई यावेळी म्हणाले.
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “त्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून दिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ते अशा पद्धतीचे वागणूक करतात, त्यांनी महिलांना धक्काबुक्की केली आहे. हे निषेधार्ह आहे”, असं नरेश म्हस्के म्हणाले. “आम्ही स्वतंत्र भारतात राहतो. ही जागा त्यांच्या बापाची नाही”, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. “तुम्ही त्यांनाही बाहेर काढा. ही जागा कुणाच्या बापाची नाही”, असं नरेश म्हस्के म्हणाले.
आमदार सदा सरवरणकर यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं कुणी शुद्धीकरण करणार असेल तर हे कोण आहेत, कोणाचे दलाल आहेत, शरद पवारांचे दलाल आहेत? शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवण्याचं काम केलं. पण ती ज्योत हे विझवण्याचं काम करत आहेत आणि इथे कशासाठी येत आहेत? आमच्या बघिणींवर त्यांनी हात टाकले आहेत. हे त्यांना शोभतं का?”, असा सवाल आमदार सदा सरवणकर यांनी केला.
“शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीदेखील ठाकरे गटावर निशाणा साधला. आम्ही शिंदे गट नाही तर आम्ही शिवसेना आहोत. आम्ही खरी शिवसेना आहोत. आमच्याकडे धनुष्यबाण आहे. हे कोण, त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना विचारा. त्यांची निशाणी काय ते विचारा. आम्हाला सर्व महिलांना धक्काबुक्की केली. आम्हाला मारण्यासाठी रॉड काढले, उद्या गोंधळ नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज याचचा निर्णय घेतला. यांना आज इथे यायची गरज काय होती? हे एवढ्या मोठ्या संख्येने का आले? स्मृतीस्थळाचं पावित्र्य तुम्ही घालवलं आहे. त्यांना लाज वाटलं पाहिजे. तुम्ही महिलांना धक्काबुक्की करता. त्यांच्याकडे हरवण्यासाठी काही नाही”, असा घणाघात शीतल म्हात्रे यांनी केला.