दिघा रेल्वे स्थानकावर उद्घाटनाच्या पूर्वीच राडा, राजन विचारे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

| Updated on: Jan 12, 2024 | 4:01 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने उत्साहाचं वातावरण असताना दिघा रेल्वे स्थानकावर आज राडा झाला. दिघा रेल्वे स्थानकावर आज ठाकरे गटाचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तसेच खासदार राजन विचारे आणि पोलिसांंमध्ये यावेळी बाचाबाचीदेखील झाली.

दिघा रेल्वे स्थानकावर उद्घाटनाच्या पूर्वीच राडा, राजन विचारे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
Follow us on

मुंबई | 12 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक आणि त्यानंतर मुंबई शहराच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते नाशिकमधील विविध विकासकामांचं लोकार्पण झालं. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले आहेत. मोदींच्या हस्ते आज बहुप्रतिक्षीत शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण झालंय. तसेच नवी मुंबई विमानतळाच्या मैदानावर मोदींचं जाहीर भाषण होणार आहे. यावेळी देखील विविध विकासकामांचं लोकार्पण होईल. तसेच मोदींच्या हस्ते आज दिघा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन होईल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी दिघा रेल्वे स्थानकावर दाखल होण्यापूर्वी चांगलाच राडा झाल्याचं बघायला मिळालं. दिघा स्थानकावर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालीय. इतकंच नाही तर राजन विचारे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

दिघा स्थानकावर पोहोचल्यानंतर पोलीस आणि राजन विचारे यांच्यात बाचाबाची झाली. राजन विचारे रेल्वे स्थानकावर पोहोचले त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोदी-मोदी अशा घोषणा करण्यात आल्या. यातील बरेचशी विकासकामे ही महाविकास आघाडीच्या काळात झाली होती मात्र निमंत्रणाच्या पत्रिकेवर कुठेही ठाकरे गटाच्या नेत्यांची नावे नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाने याविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राजन विचारे दिघा स्थानकावर आल्यानंतर पोलीस आणि राजन विचारे यांच्यात बाचाबाची झाली. याच दिघा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

दिघा स्थानकावर नेमकं काय घडलं?

राजन विचारे रेल्वे स्थानकावर आले तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. दिघा रेल्वे स्थानकाचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने तिथे भाजप कार्यकर्त्यांनी आधीच गर्दी केलेली आहे. तसेच राजन विचारे येणार असल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीदेखील तिथे गर्दी केलेली होती.

यावेळी राजन विचारे रेल्वे स्थानकावर आले तेव्हा ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचं स्वागत केलं. याच दरम्यान राजन विचारे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर रेल्वे स्थानकावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणाबाजी केली. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. ठाकरे गटाच्या कार्यतर्त्यांकडून ठाकरे-ठाकरे अशी घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.