ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील हॉटेल व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. अनधिकृत ढाब्यांवर खुले आम होणाऱ्या मद्य विक्री विरोधात हॉटेल चालकांनी आता ठोस भूमिका घेतली आहे. यामुळे डोंबिवलीमध्ये गुरुवारी खवय्यांचे हाल होणार आहे. डोंबिवलीमधील हॉटेल गुरुरवारी २८ मार्च रोजी बंद राहणार आहे. अधिकृतपणे मद्य विक्रीचा केली जात आहे. त्याविरोधात वारंवार तक्रारी करून देखील संबंधित विभागाकडून या अनधिकृत ढाबेचालकांवर कारवाई होत नाही. यामुळे हॉटेल व्यवसायिक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी हॉटेल चालकांनी गुरुवारी बंदची हाक दिली आहे. या बंदला डोंबिवलीतील सर्व हॉटेल चालकांनी पाठिंबा दिला आहे.
हॉटेलमध्ये विक्री करण्यासाठी विविध प्राधिकरणाचे परवाने घ्यावे लागतात. तसेच हॉटेल चालक ग्राहकांना बसल्या जागी सेवा देता यावी यासाठी लाखो रुपये भरावे लागतात. मात्र याच वेळी डोंबिवली शहरात आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या धाब्यांमधून अधिकृतपणे मद्य विक्री होत आहे. या भागात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर दारू विक्री केली जात आहे. तसेच ग्राहकांकडून ढाब्यांवरती दारू पिण्याला पसंती दिली जात आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
हॉटेल चालकांचा व्यवसाय रोडवल्याने त्यांच्याकडून सरकारला जाणारे उत्पन्न कमी झाले. यामुळे हॉटेल चालकांवर शासनाकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप हॉटेल चालकांनी केला आहे. याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतरही ढाबे चालकांवर कारवाई होत नसल्याने त्रस्त डोंबिवली हॉटेल बार असोसिएशनने बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये डोंबिवलीतील सर्व हॉटेल चालकांनी सहभाग घेण्याचे ठरवले असल्याने गुरुवारी डोंबिवली खाद्य प्रेमींचे मात्र हाल होणार आहेत.
दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या तक्रारीची दखल घेत अनधिकृत ढाबेचालकांवर वर्षभरात केल्या जाणाऱ्या कारवाई बरोबरच कारवाईत वाढ करण्यात आली असून नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे