डोंबिवलीकरांसाठी तीन आठवड्यात दुसऱ्यांदा धक्कादायक बातमी आली आहे. तीन आठवड्यांपूर्वी डोंबिवलीमधील अंबर केमिकल कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 72 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. त्याच्या जखमा अजूनही भरल्या नसताना बुधवारी पुन्हा स्फोट झाला. आता डोंबिवलीमधील एमआयडीसीत पुन्हा आग लागली आहे. या वेळी झालेल्या स्फोटांच्या प्रचंड आवाजामुळे डोंबिवलीकरांचा काळजाचा ठोका चुकला. दूरपर्यंत धुरांचे लोट दिसून आले. तीन आठवड्यापूर्वीचे दृश्य पुन्हा ताजे झाले. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. पहिल्या घटनेची चौकशी अजूनही पूर्ण झाली नसताना दुसऱ्या घटनेची चौकशी करण्याचे कागदी उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.
दोन आठवड्यापूर्वी ज्या भागात आग लागली होती, त्या कंपनीच्या शेजारीच पुन्हा बुधवारी सकाळी दहा वाजता आग लागली. त्यावेळी त्या परिसरात असलेल्या सर्व गाड्या जळून खाक झाल्या आहेत. मालदे आणि इंडो अमाईन्स या दोन कंपनीत आग लागून एकामागे एक स्फोटांचे आवाज आले. या आगीत कंपनीचे तीन प्लॅन्ट जळून खाक झाला आहे. हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. त्याच परिसरात शाळा आहे. आगीची घटना समजताच शाळेला सुट्टी देण्यात आली. आग लागलेल्या कंपनीत कोणी होते की नाही? त्यासंदर्भात माहिती मिळाली नाही. आग कशामुळे लागली? त्याची माहिती मिळाली नाही.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसतील महानगरपालिकेतून टँकर मागवण्यात आले आहे. कल्याण, बदलापूर, उल्हासनगरमधून अग्नीशनम दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. परंतु दोन तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळाले नाही. डोंबिवली एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, कल्याण अग्निशमन दलाच्या २, पलावा एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाची एक गाडी तसेच ठाणे अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी आहे. डोंबिवलीमधील धोकादायक कंपन्या बंद कराव्या, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कल्याण-डोंबिवली मनपाच्या आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितले की, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचली आहे. तसेच पोलीस फोर्स आहे. एमआयडीसी हा प्रकार कसा घडला? त्याची चौकशी करणार आहे. मागील आगीसंदर्भात यापूर्वीच एक समिती नियुक्ती करण्यात आली होती.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे डोंबिवलीकर वैतागले आहेत. आज इंडो अमाईन कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. या धुराचा त्रास स्थानिक नागरिकांना होतांना पाहायला मिळतोय. वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण असून जीव मुठीत धरून आम्ही या ठिकाणी राहत असल्याच्या भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच एमआयडीसीत असलेल्या सर्व केमिकल कंपनीचं लवकरात लवकर स्थलांतर करा अशी मागणी आता स्थानिक करताना पाहायला मिळत आहेत.