मुंबई : पोर्न स्टारसोबतचे संबंध लपवण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी लाच दिल्याप्रकरणी त्यांची कालअटक आणि सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणाची नियमित सुनावणी आता जानेवारी 2024पासून सुरू होणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ट्रम्प यांच्या मुद्द्यावरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला चिमटे काढण्यात आले आहेत. आता डोनाल्ड ट्रम्पही भाजपमध्ये प्रवेश करून आरोप मुक्त होणार आहेत, असा टोला दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
भ्रष्टाचारी मंडळी भाजपमध्ये येत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कौतुक वाटत असेल. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यांचे सूटबूट भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील. त्यामुळे ईडी आणि सीबीआयने फक्त कपडे वाळत घालून त्याला कडक इस्त्री करावे. मोदींना नेमके हेच सांगायचे आहे, अशी टीका दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली आहे.
अग्रलेखातून धनुष्यबाण आणि शिवसेना या नावावरूनही भाजपवर टीका करण्यात आली आहे. केंद्रातील भाजप सरकारने राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यास हातभार लावला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचा सौदा करून विकला. तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? असा सवालच अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आला आहे. मोदींनी सीबीआयच्या स्थापनेवेळी केलेले भाषण हे भ्रष्टाचार मोडून काढणारे नसून यंत्रणांच्या मनमानीस उत्तेजन देणारे आहे. आमच्या विरोधकांना सोडू नका. भाजप तुमच्या पाठीशी आहे, असा हल्लाबोलही अग्रलेखातून करण्यात आला आहे.
शिवसेनेतून फुटलेले 5 खासदार आणि 9 आमदार ईडी आणि सीबीआयच्या हिटलिस्टवर होते. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच ते भाजपच्या वॉशिंग मशिनमधून धुवून निघाले. एकीकडे पंतप्रधान भ्रष्टाचार मोडून काढण्याची भाषा करत आहेत. त्यांच्याकडेच भ्रष्टाचार धुवून काढण्याची मशीन आहे. त्यामुळे अशी भाषा वापरून त्यांचेच हसे होत आहे, अशी खोचक टीकाही करण्यात आली आहे.
सीबीआय म्हणजे मोदी आणि शाह यांच्या पिंजऱ्यातील पोपट आहे. एकेकाळी सीबीआय म्हणजे काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असल्याचा आरोप मोदींनी केला होता. आज काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. त्यामुळेच सीबीआयचा पोपट मालक सांगेल त्याप्रमाणे विटू विटू किंवा मिठू मिठू करत असल्याची टीकाही करण्यात आली आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणा मोदींसाठी ढवळ्या आणि पोवळ्यासारखं काम करत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.