शिर्डी – रक्षाबंधनाच्या दिवशीच शिर्डीतील (Shirdi Sai Baba)साईबाबांच्या चरणी एका भाविकाने सोन्याचा मुकुट (Gold Crown)अर्पण केला आहे. 36 लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट आणि 33 हजारांचे चांदीचे ताट (Silver Plate)अर्पण करण्यात आले आहे. आंध्रप्रदेश मधील एका साईभक्ताने साईंच्या झोळीत हे लाखोंचे दान केलेले आहे. अन्नम सतीश प्रभाकर असे या साईभक्ताचे नाव आहे. 770 ग्राम वजनाचा सोन्याचा मुकुट आणि 620 ग्राम वजन असलेले चांदीच ताट यावेळी साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने साईबाबांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांचा ओघ वाढता असल्याने या ठिकाणी असलेल्या देणग्यांचे प्रमाणही मोठे आहे.
जुलैत झालेल्या गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यंदाच्या गुरुपोर्णिमेला तीन लाखांहून जास्त भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यात काही परदेशी भाविकांचाही समावेश होता. या तीन दिवसांत साईबाबांच्या चरणी 5 कोटी 12 लाख 408 रुपयांच्या देणग्या आल्या आहे. यातील 20 लाख हे परकीय चलनाच्या रुपात जमा झालेले आहेत. 12 देशांतील भाविकांनी हे दान दिले आहे.
आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी आणि शिर्डीतील साईबाबा संस्थान ही देशातील श्रीमंत देवस्थाने म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्र, आंध्र, गुजरात यासह अनेक राज्यांतून दररोज हजारो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असतात. वर्षागणिक साई संस्थानाला मिळत असलेल्या देणग्या या कोट्यवधींच्या घरात आहेत. दररोज सुमारे दोन कोटींचे दान साईबाबांच्या चरणी येते, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. कोरोनानंतरच्या काळात पुन्हा एकदा शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला मोठी गर्दी होऊ लागली आहे.
शिर्डीतील साईबाबा संस्थानला मोठ्या प्रमाणात देणग्या येत असल्याने, या मंदिराच्या ट्रेस्टच्या वतीने अनेक समाजपयोगी कामेही केली जातात. संस्थानच्या वतीने काही शाळा, हॉस्पिटले संचालित केली जातात. सौर ऊर्जेवर चालणारे सर्वात मोठे प्रसादायल श्रिडीत कार्यरत आहे. दररोज या ठिकाणी 50 हजारांहून अधिक जणांना प्रसाद दिला जातो. त्याचबरोबर सव्वा रुपयांत लग्न लावून देण्यासारखे सामाजिक बांधिलकीचे उपक्रमही इथे राबवले जातात. गरीब परिवारांना मदत देण्यात शिर्डीचे साईबाब संस्थान अग्रेसर असल्याचे मानण्यात येते. कोरोनाच्या काळातही शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडून अनेकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता.