देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या विधीमंडळाच्या बैठकीत बोलत असताना निवडणूक निकालाचं संपूर्ण गणित समजून सांगितलं. भाजपचा पराभव का झाला याबाबत ही त्यांनी खुलासा केलाय. ते म्हणाले की, एक विशिष्ट नेरेटिव्ह तयार करण्यात आलं ज्यामुळे भाजपचा पराभव झाला. फडणवीस म्हणाले की, ‘निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली. देशाच्या इतिहासात मोदींची सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. पंडित नेहरु यांची बरोबरी करणारे असे आपले नेते पंतप्रधान मोदी यांची एकमताने एनडीएने निवड केली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण एकत्र आलोत.’
‘एकीकडे याचा आनंद आहे. देशातील लोकांनी मोदींवर विश्वास दाखवला. २०१४ आणि २०१९ आपला सिंहाचा वाटा होता. पण यंदा आपण तसं करु शकलो नाही. नव्याने आपल्याला रणनीती आखता यावी यासाठी आजची बैठक महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात जे यश मिळालं नाही त्याचं कारणं शोधून ती दूर करता येतील आणि महायुतीचं विधानसभेत सरकार कसं आणता येईल.’
‘उन्हाळा संपतोय. पावसाळा जवळ आलेला आहे. पाऊस पडल्यानंतर जे पेललं जात तेच नंतर उगवतं. आता नव्याने पेरण्याची वेळ आला आहे. यशाचे बाप अनेक असतात पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असते. नवीन निर्धार करायचा असतो. मी या अपयशाची जबाबदारी घेतली. पॉलिटिकल अर्थमेटिकमध्ये कमी पडलो. देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नाही. आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे. कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो तर ते सत्य नाही. मी अमित शाहांना भेटून आलो आहे. त्यांना माझी भूमिका सांगितली. त्यांनी सांगितलं आपण महाराष्ट्राची ब्लूप्रिंट तयार करु.’
‘देशात ज्या प्रकारे मोदींजींना समर्थन दिलं. ओडिसामध्ये आपलं सरकार आलं. आंध्रप्रदेशमध्ये एनडीएचं सरकार आलं. अरुणाचल मध्ये आपलं सरकार आलं. मोदी म्हणाले की, त्यांना तीन निवडणूका मिळून जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या. इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या एकट्या भाजपला मिळाल्या. महाविकासआघाडीला ४३.३ तर महायुतीला ४३.६ टक्के मतं मिळाली आहेत. केवळ २ लाख मत महाविकासआघाडीला जास्त मिळाल्या आहेत.’
‘मुंबईत त्यांना २४ लाख मते आहेत आपल्याला २६ लाख मते मिळाली आहेत. पण त्यांना ४ जागा मिळाल्या आपल्याला २ जागा मिळाल्या. आपण खोट्या नरेटिव्ह सोबत लढत होतो. हा चौथा पक्ष होता. त्याला आपण रोखू शकलो नाही. संविधान बदलणार असं पसरवलं गेलं. दलित, आदिवासी समाजात हा नरेटिव्ह तयार झाला. असा नरेटिव्ह एखाद्या निवडणुकीसाठी असतो. खोटा मुद्दा एका निवडणुकीपर्यंत मर्यादित असते. जेव्हा जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा मोदींनी आधी संविधानाची पूजा केली आहे.’
‘भारताच्या संविधानाचा महोत्सव साजरा केला जाणार आहे. असं मोदींजींनी सांगितलं आहे. पक्ष फोडाफोडीवरुन दुसरा नरेटिव्ह तयार झालं. मराठा समाजाने नरेटिव्ह तयार केलं. आपण त्यांना आरक्षण दिलं. सवलतीची योजना, हॉस्टेलची योजना आपल्या काळात झाल्या. ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना मते गेली.याचा अर्थ असा की हे पण टिकणार नाहीये. काही प्रमाणात ते यशस्वी झाले. पण आपले मतं कमी झालेले नाही.’