“महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी अभिवादन करतो. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आहेत, त्या सर्वांना माझ्याकडून आदरपूर्वक जय भीम” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. चैत्यभूमीवर 68 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. “बाबासाहेबांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत. बाबासाहेबांच संविधान आपल्यासोबत आहे” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“बाबासाहेबांच संविधान आपल्यासोबत आहे. आपण इथे माणुसकी धर्म पाळण्यासाठी जमलो आहोत. काल आझाद मैदानात ऐतिहासिक शपथविधी झाला. देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची, आम्ही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची आम्ही शपथ घेतली. खरं म्हणजे ती संविधानाची शपथ होती. कालच्या समारंभात बाबासाहेब होते. आजही आपल्यासोबत आहेत. बाबासाहेब कायमच आपल्यासोबत आहेत. चंद्र, सूर्य आणि सत्य या सोबत चौथी कायमस्वरुपी परमनंट आपल्यासोबत असलेली गोष्ट म्हणजे बाबासाहेबांच संविधान” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘बाबासाहेब का संविधान बना रहेगा’
“मी नेहमी म्हणतो. जब तक सूरज, चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा. बाबासाहेबांनी सांगितलेल्या महामार्गावरुन आपण चालण्याचा प्रयत्न करतोय. चैत्यभूमीवर माथा टेकवण म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या जीवनमुल्यांचा जागर करणं होय” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झालं’
“मी नेहमी म्हणतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो, समाजकारण करता, करता, राजकारणात कसं आलो, कळलच नाही. कोणी मुख्यमंत्री झाला, कोणी उपमुख्यमंत्री. एका सामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता या पदापर्यंत पोहोचू शकला, ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे. सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती देशाची पंतप्रधान बनू शकते. आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते, हे शक्य झालं ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे” अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा गौरव केला.
‘टीम बनून काम करु’
“मुख्यमंत्री आहेत इथे, त्यांच्या नेतृत्वात आम्ही राज्याला पुढे नेण्यासाठी टीम बनून काम करू, राज्याला पुढे नेऊ. संविधानाचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात झाला. प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात संविधान मंदिर बांधण्याची घोषणा आम्ही केलीय आणि त्याचं काम सुरू आहे. या ज्ञानाच्या महासागरा समोर नतमस्तक होतो” असं एकनाथ शिंदे म्हणाले.