मुंबई : मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत सापडलेले ड्रग्स व हत्यारांच्या कारखान्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईत विक्रीस बंदी असताना सुद्धा बेकायदेशीररित्या ड्रोन विक्रीचे रॅकेट उघड झाले आहे. मुंबईत अशा प्रकारे दिवसाढवळ्या अंमली पदार्थ, हत्यारे, ड्रोनची विक्री सुरू असताना व मुंबईत सुरक्षेचे धिंडवडे निघत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?, मुंबईत आणखी एक 26/11 होण्याची वाट पाहिली जात आहे का? असे सवाल भाजप मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. (Drone racket exposed in Mumbai, is Government waiting for 26/11 again? Question by Atul Bhatkhalkar)
भातखळकर म्हणाले की, एका आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाचे विशेष पथक मागील वर्षी ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रात आले होते. या पथकाकडून वर्षभराच्या काळात राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला, तसेच मुंबईच्या डोंगरी, मुंबई शेजारील पनवेल, भिवंडी यांसारख्या परिसरात धाडी टाकून अंमली पदार्थ व हत्यारांचे कारखाने असल्याचे उघड केले होते. या संदर्भात मी स्वतः मागणी करून मुंबईसह राज्यात वाढत चाललेल्या आतंकवादी व देशविघातक कृत्यांकडे लक्ष वेधले होते, किमान त्यांनंतर तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थ व बेकायदेशीर हत्यार विक्रीची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती.
एका प्रमुख वृत्तपत्राने शुक्रवारी मुंबईतील बोरा बाजार, लमिंग्टन रोड, गोरेगावच्या मोतीलाल नगर परिसरात स्टिंग ऑपरेशन करून बेकायदेशीररित्या विक्री केल्या जाणाऱ्या ड्रोन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशा प्रकारे ड्रोन विक्री करणाऱ्या दलालांचे रॅकेट सुद्धा या स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड करण्यात आले. एका वर्तमानपत्राच्या स्टिंग ऑपरेशन मधून एवढे मोठे रॅकेट उघडकीस होऊ शकले तर राज्याच्या गृहविभागाला याची माहिती नसेल काय? असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईसारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. वाझे प्रकरणावरून ‘वसुली’ सरकार अशी बिरुदावली मिळालेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, दिवसा ढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे. राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली आतंकवादी कृत्ये, हत्यारे, अंमली पदार्थ व ड्रग्सची खुलेआम विक्री थांबवून गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असा खोचक सल्लासुद्धा आमदार भातखळकर यांनी दिला आहे.
सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपा काढतायत.
मुंबईत दिवसाढवळ्या अंमली पदार्थ, हत्यारे सापडतात. खुलेआम ड्रोनची विक्री होते आणि राज्य सरकार फक्त वसुलीत गुंतले आहे.
राज्यात आणखी एक २६/११ घडवण्याची सुपारी घेतली आहे का ठाकरे सरकारने ? pic.twitter.com/zU5JdbA5Ua— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 10, 2021
इतर बातम्या
फी वाढ, सक्तीची फी वसुली करणाऱ्या शाळांची NOC रद्द करण्याचा निर्णय निव्वळ धूळफेक : Atul Bhatkhalkar
तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल, अतुल भातखळकरांचा घणाघात
(Drone racket exposed in Mumbai, is Government waiting for 26/11 again? Question by Atul Bhatkhalkar)