Water Taxi in Mumbai: मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याचे सांगितले आहे. या निर्णयामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या मुंबईकरांना आणखी एक प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांच्यात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत ई-वॉटर टॅक्सी सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गावर ई-वॉटर टॅक्सी सुरु होणार आहे. या ई-वॉटर टॅक्सी प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना आणखी एक पर्याय मिळणार आहे.
वॉटर टॅक्सीचे दर किती असणार त्याचा खुलासा अजून झालेला नाही. परंतु सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे माफक दर ठेवावेत, असे राज्य शासनाने स्वीडीश कंपनीला सांगितले आहे. तसेच ई वॉटर टॅक्सीच्या परवान्याबाबत राज्य शासन दक्षता घेईल, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत दिले. मुंबईत सुरु होणाऱ्या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीमधून २५ प्रवाशी प्रवास करू शकतात. यामध्ये ६४ किलोवॅटची बॅटरी असणार आहे.
मुंबईप्रमाणे दिल्लीत वॉटर टॅक्सी सुरु करण्याची तयारी सुरु झाली आहे. दिल्लीवरुन नोएडापर्यंत वॉटर टॅक्सी सुरु करण्यात येणार आहे. या नवीन परिवहन व्यवस्थेत यमुना नदीही स्वच्छ करण्यात येणार आहे. वॉटर टॅक्सीचा मार्ग मदनपूर खादर ते आयटीओ असा असणार आहे. या प्रवासासाठी दिल्लीतील मदनपूर खादर, फिल्मसिटी, निजामुद्दीन आणि आयटीओ येथे वॉटर टॅक्सी स्टेशन बांधण्यात येणार आहेत. या टॅक्सी सेवेमुळे एकावेळी 20 ते 25 प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे शक्य होणार आहे.