मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोठडीत घरचे जेवण देण्याची केलेली मागणी फेटाळण्यात आली आहे. आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दात फटकारत कोर्टाने देशमुखांच्यावतीने करण्यात आलेला विनंती अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच देशमुखांना ईडी ऐवजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपल्याने त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देत त्यांना घरचं जेवण मिळण्याची विनंती केली होती. त्यावर आधी तुम्ही तुरुंगातील जेवण घ्या. योग्य वाटलं नाही तर विचार करू, असं कोर्टाने सांगितलं. मात्र, त्यांना तुरुंगात वेगळा बेड देण्याची विनंती मान्य करण्यता आली आहे. प्रकृतीचं कारण दिल्याने त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांची ईडीकडून चौकशीही झाली. त्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर ईडीचे छापेही पडले होते. त्यानंतर त्यांना पाच वेळा समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र, तरीही ते ईडी समोर हजर राहिले नव्हते. त्यांना 26 जून रोजी समन्स पाठवलं गेलं होतं. त्यानंतर ते थेट नोव्हेंबरमध्ये ईडीच्या समोर उपस्थित राहिले होते. देशमुख यांच्या पत्नीलाही ईडीने दोनदा चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. पण त्या एकदाही ईडीसमोर हजर राहिलेल्या नाहीत.
देशमुख हे ईडीसमोर हजर राहिल्यानंतर त्यांची मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला होता. आर्केस्ट्रा आणि बारमालकांकडून 4.7 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
VIDEO : 36 जिल्हे 50 बातम्या | 15 November 2021https://t.co/UC4PvXVAeA#36JILHE50BATMYA #36district50news #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
संबंधित बातम्या:
‘..तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, आशिष शेलारांचा नवाब मलिकांना इशारा
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला; 29 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी