मुंबई : केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ईडीच्या (Enforcement Directorate) च्या नोटीसीने भल्याभल्यांना घाम फुटत असतो. अनेकांनी या ईडीचा धसका घेतला असला तरी या केंद्रीय संस्थेच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयाचा फलकावर केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतच कार्यालयाचे नाव लिहीलेले होते. त्यामुळे यासंदर्भात मराठी एकीकरण समितीने पत्र लिहून मराठी भाषेतही कार्यालयाचे नाव लिहीण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने मराठी भाषेतही फलकावर नाव लिहीण्याचे आदेश दिले. त्यानंतर फलकांवर अखेर मराठीला स्थान मिळाले.
ईडी म्हणजेच ( सक्तवसुली /अंमलबजावणी संचालनालय ) या केंद्रीय तपास यंत्रणेच्या दक्षिण मुंबईतील बेलार्ड ईस्टेट कार्यालयाच्या दर्शनी भागातील फलकावर कार्यालयाचे नाव केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहीलेले होते. त्यामुळे मराठी भाषेला तिच्या राजधानीत डावलेले गेल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. यामुळे मुंबई महानगर पालिकेने अलिकडेच मुंबईतील सर्व दुकानांना मराठी भाषेतही फलक लिहीण्याचे आदेश दिले होते.
राज्याच्या राजधानीतच मराठी भाषेला स्थान न दिल्याचा मुद्दा मराठी एकीकरण समितीने ऐरणीवर आणला होता. मराठी भाषेला डावलले जात असल्याने मराठी भाषेतही कार्यालयाचे नाव लिहिण्याची मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या फलकावर मराठी भाषेत कार्यालयाचे नाव ठळकपणे लिहिण्याचे आदेश दिले होते.
अनेक वर्षे हे कार्यालय महाराष्ट्रात आहे, अनेक दिग्गज इथे जाऊन आले पण फलकावर मराठी नाही हे कोणाला खटकले नव्हते. त्रिभाषा सूत्राचा विसर केंद्राला पडला होता. त्रिभाषा सूत्राप्रमाणे स्थानिक भाषेचाही समावेश असायला हवा होता. ईडी अनेकांना नोटीस धाडते, परंतू
मराठी एकीकरण समितीने ईडीला नोटीस धाडून फलकावर मराठी भाषा आणली आणली आहे. यासाठी 2019 पासून पाठपुरावा सुरू होता असे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले.