गिरीश गायकवाड, मुंबई, दि.25 जानेवारी 2024 | अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) चौकशी आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या परिवारापर्यंत आली आहे. पाच लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप राऊत यांना ईडीची नोटीस आली आहे. संदीप राऊत यांना खिचडी घोटाळा प्रकरणी तपासासाठी 30 जानेवारी रोजी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहे. ही नोटीस आल्यानंतर संजय राऊत चांगलेच भडकले. विरोधी पक्षातील लोकांना नोटीस देण्याचे एकमेव उद्योग भाजपचा सुरु आहे. संदीप राऊत यांच्या चौकशीसाठी दिलेले कारण हास्यापद असल्याचे सांगितले.
संजय राऊत यांच्या परिवारात नोटीस आली. त्यानंतर संजय राऊत भाजपवर चांगलेच संतापले. नोटीस काढतात फक्त 8000 कोटींचा ॲम्बुलन्स घोटाळा नोटीस काढणार नाही. राहुल कुल यांचा मनी लॉन्ड्री नोटीस काढणार नाही. गिरणा सहकारी कारखाना 89 कोटींचा मनी लॉन्ड्री प्रकरणात नोटीस काढणार नाही. अजित पवार यांच्या 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा किंवा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात नोटीस काढणार नाही, बिस्वा शर्मा यांना नोटीस निघणार नाही. परंतु महाराष्ट्रात आणि देशांमध्ये जे विरोधी पक्षांमध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढली जात आहे. परंतु आमच्या रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलवले जात आहे. रवींद्र वायकर यांना नोटीस काढली आहे. हे सगळे लोक भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही विरोधात लढणारे लोक आहेत.
संदीप राऊत यांना पाच लाखांच्या खिचडी गैरव्यवहार प्रकरणात नोटीस आली आहे. कोरोना काळातील हा प्रकार आहे. कोरोनाकाळात मुंबईत अडकलेल्या लोकांना २५० ग्रॅम खिचडी वाटप करण्याचा निर्णय झाला होता. परंतु ही खिचडी कमी वाटप झाली. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, दोन लाखांचा कुठे व्यवहार आहे, पाच लाखांचा कुठे व्यवहार आहे. त्यांना नोटीस दिली जात आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांना 500 रुपये क्राउड फंडिंग केला म्हणून अटक केली. परंतु आयएनएस विक्रांत बचावसाठी किरीट सोमय्या यांनी कोट्यावधी रुपये गोळा केले. रस्त्यावरती उभे राहून आणि उद्योगपती यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले त्याच्यावरचा गुन्हा तुम्ही रद्द करता, असा हल्ला राऊत यांनी केला.