गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे सचिव सूजर चव्हाण यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. चेंबूर येओथील के के ग्रँड इमारतीतील सूरज चव्हाण यांच्या 11 व्या मजल्यावर छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. कोविडच्या काळात लाईफलाईन सर्व्हिस या कंपनीने केलेल्या घोटाळ्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या छापेमारीचं वृत्त येताच शिवसैनिकांनी चेंबूर येथे चव्हाण यांच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली. यावेळी शिवसैनिक आपल्या जुन्या आवेशात दिसले. या शिवसैनिकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे चव्हाण यांच्या इमारतीखाली तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केल्यानंतर शिवसैनिकांचा पारा चढला. असंख्य शिवसैनिकांनी चव्हाण यांच्या घराबाहेर जमून या कारवाईचा निषेध नोंदवला. तसेच शिंदे सरकार विरोधात संतापही व्यक्त केला. हे दिल्लीवाले महाराष्ट्राला घाबरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दबाव टाकून जिंकू असं त्यांना वाटत आहे. पण ते कधीच साध्य होणार नाही. जेवढा दबाव टाकाल तेवढा शिवसैनिक पेटून उठेल. शिवसैनिक या लोकांना महाराष्ट्रातून नामशेष केल्याशिवाय बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एका शिवसैनिकांने दिली. हा शिवसैनिक जेव्हा प्रतिक्रिया देत होता. त्यावेळी इतर शिवसैनिक जोरदार घोषणा देत होते. शिवसैनिकांचा पारा प्रचंड चढलेला होता. पूर्वीच्या आवेशातच शिवसैनिक दिसत होता.
सूरज चव्हाण यांच्या पाठोपाठ कोव्हिड सेंटर घोटाळ्या प्रकरणी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली आहे. ईडीचे 6 ते 7 अधिकारी आज सकाळी वांद्रे पूर्व येथील रुस्तमजी ओरियाना टॉवरमध्ये आले आणि जयस्वाल यांच्या घरावर छापे टाकले. संजीव जयस्वाल यांच्या घरावर गेल्या अनेक तासांपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. रुस्तमजी ओरियाना टॉवरच्या चौथ्या मजल्यावर संजीव जयस्वाल यांचे घर असल्याचे सांगण्यात येत आहे. कोव्हिडच्या काळात संजीव जयस्वाल महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त होते. दरम्यान, ही छापेमारी सुरू असली तरी जयस्वाल हे घरी नसल्याची माहिती आहे.
ईडीने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या घरावर छापा मारला आहे. सांताक्रूझ पूर्व वाकोला येथील सुमित आर्टिस्टा बिल्डिंगच्या सी विंगमध्ये सुजीत पाटकर यांचे घर आहे. सुजीत पाटकर दुसऱ्या मजल्यावर राहतात. ईडीचे 6 ते 7 अधिकारी सकाळी 8.00 वाजता सुजीत पाटकर यांच्या घरी आले. सुमारे 3 तास चाललेल्या छाप्यानंतर ईडीचे पथक सकाळी 10.45 वाजता येथून निघून गेले. सध्या सुजीत पाटकर यांचे घर बंद असून घरात कोणीही नाही. त्यांच्यावरही कोव्हिडच्या काळात घोटाळा केल्याचा आरोप आहे.