मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना ईडीने (ED) समन्स बजावलं आहे. ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई केली जातेय. या दीड महिन्यात ईडी अधिकाऱ्यांनी दोनवेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी टाकल्या. ईडीच्या पथकाने आज सकाळीच मुश्रीफांच्या घरी छापा टाकलेला. तब्बल साडेनऊ तास ईडीचं पथक मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेत होतं. हे पथक दुपारी चार वाजेच्या सुमारास मुश्रीफांच्या घराबाहेर पडलं. त्यानंतर हसम मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावल्याची बातमी समोर आली आहे.
हसन मुश्रीफ यांना येत्या सोमवारी म्हणजेच 13 मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे या समन्सनंतर मुश्रीफ चौकशीला सामोरं जातात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांना याआधीदेखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. विशेष म्हणजे या छापेमारीदरम्यान मुश्रीफ हे नॉट रिचेबल आहेत.
ईडीने नुकतंच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय असेलेले सदानंद कदम यांना दापोलीत साई रिसॉर्ट प्रकरणी अटक केली. ईडीने कदम यांच्याविरोधात कारवाई करताना आधी त्यांच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आलं. तिथे जवळपास चार तासांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडी काही मोठी कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात अनेक आरोप केलेत. अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीला चालवायला दिला गेला. या दोन कंपन्यांमध्ये 2020 मध्ये करारा झाला होता. हसन मुश्रीफ यांचे जावई या कंपनीचे मालक असल्याने अनुभव नसतानाही हा करार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. तसेच कोलकाता येथील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. या संदर्भाने मुश्रीफ यांच्या घरावर आज सलग दुसऱ्यांदा धाड टाकण्यात आली. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलं.