लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवतीर्थावर, गुढीपाडवा मेळाव्यात अनेक मुद्यांना हात घातला. त्यांनी दिल्लीवारीची चर्चा केली. माध्यमातील चर्चेंना विराम देण्यासाठी गोटातील माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे गेल्या एक वर्षांपासून चांगले सूर जुळल्याचे दिसत होते. त्यावर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. शिंदे आणि फडणवीस यांनी काय साकडं घातलं हे त्यांनी स्पष्ट केले.
जागा वाटपाची चर्चा नाही
जागा वाटपाची चर्चा झाली. मी शेवटच्या जागा वाटपाच्या चर्चेला १९८५ला बसलो. त्यानंतर मी कधी चर्चेला बसलो नाही. दोन तू घे, चार मला दे. दोन तू घे. मला ते जमत नाही. माझ्याकडून होत नाही. मला ते जमणार नाही. मला सांगितलं. आमच्या निशाणीवर लढा. रेल्वे इंजिन आहे. तुमच्या कष्टाने कमावलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलेलं नाही. सहज आलंय म्हणून लढवायचं अजिबात नाही. चिन्हावर कॉम्प्रमाईज होणार नाही. दिल्लीला गेलेले ठाकरे पहिलेच. पत्रकारांना माहीत नसतं. जुन्या गोष्टी माहीत नसतात. आताच्या गोष्टीवर रेटायचं. १९८० साली बाळासाहेब ठाकरे, दिल्लीला इंदिरा गांधी, संजय गांधींना भेटायला गेले होते. भेटायला जायला काय प्रॉब्लेम आहे. मला अनेक लोक भेटायला येत असतात. मी काय समजायचं, अनेक लोक भेटत असतात. त्यात मोठेपणा कमीपणा कुठून आला, असा सवाल करत त्यांनी अमित शाह यांच्या भेटीवर त्यांचे मत मांडले.
एकत्र येण्याचं घातलं साकडं
वर्ष दीड वर्ष झाली. मुख्यमंत्री माझ्याशी बोलतात. आपण एकत्र आलं पाहिजे. एकत्र काही तरी केलं पाहिजे. म्हटलं शी… म्हटलं काय केलं पाहिजे? असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय. फडणवीस आणि शिंदे सांगत होते एकत्र आलं पाहिजे. म्हटलं म्हणजे काय. मग त्यात विषय निघाले. म्हणून अमित शाह यांना फोन केला आणि म्हटलं मला भेटायचं. काय चाललंय मला समजायचं आहे. मग आमचं बोलणं झालं, याविषयीची माहिती राज ठाकरे यांनी दिली.
कोणत्याही सेनेचा प्रमुख होणार नाही
समजलंच नाही. जाऊन दे. तो झाला भूतकाळ. त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष होणार नाही. मी जे मनसे नावाचं अपत्य जन्माला घातलंय त्याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. १८ वर्ष झाली. असली गोष्ट मनाला शिवतही नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.