राज्यातील राजकारणात गेल्या दोन वर्षांपासून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना तर दुसरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेते रोज एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करत असतात. परंतु जुन्या शिवसैनिकांकडून अजूनही दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे, असा सूर निघत असतो. मध्यंतरी मुंबईत दोन्ही शिवसेने एकत्र यावे, असे बनर्स लागले होते. आता यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेची दोन्ही गट एकत्र येणार का? त्याची चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेनेची खरी दौलत म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. परंतु काही लोकांची निष्ठा बदलली आहे. त्यांना आता शिवसेना प्रमुखांपेक्षा शरद पवार, राहुल गांधी दौलत वाटत आहेत. त्यांच्या आणि आमच्या विचारसरणीमध्ये खूप फरक आहे. त्याचा आम्हाला त्रास होतो. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. आताही त्यांनी त्यांची दिशी बदलली तर दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
आम्ही उठाव वेगळ्या भावनेतून केला आहे. शिवसेना प्रमुखांचा विचार? ही आमची भूमिका आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते, ते म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेसाठी ८० जागांची मागणी केली आहे. त्यावर संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, अनिल पाटील यांनी ८० नव्हे तर १०० जागा मागव्या, १५० जागा मागव्या पण पक्षाच्या बैठकीत मागव्यात. चॅनलवर बोलून त्यांना जागा मिळणार नाही.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभातील चोवीस तास उलटले नाहीत, तोवर एनडीए गटातील खदखद चव्हाट्यावर समोर आली आहे. शिवसेनेला केंद्रीय राज्यमंत्रीपद दिल्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त आहे. यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवे होते. एनडीएमधील काही पक्षांचे एक-एक खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेटमंत्रीपद दिले गेले. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असा आरोप खासदार बारणे यांनी केला आहे.