मुंबई : महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “तीनही पक्षांनी एवढी मेहनत घेतली, किती बैठका घेतल्या, किती तयारी केली, आणि मोर्चा आपण पाहिलेला आहे की त्याला किती यश मिळालं आहे. ते मला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आमच्या कोकणातील सभेची माहिती घ्यावी”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच राज्य सरकारचं काम पाहून विरोधकांची पायाखालची जमीन सरकलीय, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.
“सत्ता गेल्याने हताश झालेले लोक, आपण तीच-तीच भाषणं पाहिली. आरोप-प्रत्यरोपांची चढाओढ लागलेलीदेखील आपण पाहिली. खरं म्हणजे जे चार-पाच महिन्यांपासून आम्ही जे काम करतोय ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकरली आहे. त्यामुळे त्यांना हताशपणा आणि नैराश्य आलेलं आहे”, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
‘मोदी-शाह यांचा भक्कम पाठिंबा’
“एवढी मोठी तयारी, तीन पक्ष आणि आणखी लोकांची मदत घ्यावी लागली. मुंबईत भगवा झेंड्यापेक्षा इतर झेंडे जास्त दिसत होते. त्यामुळे शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आमदार, खासदार, पदाधिकारी रोज प्रवेश करत आहेत. त्यामुळे हे सरकार भक्कम आहे. केंद्राचा भक्कम पाठिंबा आहे. मोदी-शाह यांचा भक्कम पाठिंबा आहे. म्हणून आम्ही निर्णय घेतोय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
‘सरकार पाडण्याचे ते मुहूर्तावर मुहूर्त काढत आहेत’
“नैराश्यापोटी सरकार पाडण्याचे दावे केले जात आहे. कुणी त्यावेळी म्हणालं होतं की एक महिन्यात सरकार पडेल. पण पाच महिने झाले. आता फेब्रुवारीचा मुहूर्त काढलाय. ते मुहूर्तावर मुहूर्त काढत आहेत. एवढंच आहे की, त्यांना त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी, कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत”, असं शिंदे म्हणाले.
‘सरकार कार्यकाळ पूर्ण करणार, परत निवडून येऊ’
“हे सरकार मजबूत आहे. सरकार सर्व कार्यकाळ पूर्ण करेल. तसेच पुढच्या निवडणुकीत आमचं युतीचं सरकार प्रचंड बहुमताने येईल”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
‘लफंगे कोण आहे हे महाराष्ट्राने पाहिलंय’
“लफंगे कोण आहे हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी लफंगेगिरी कोणी केली? बाळासाहेबांचे विचार कुणी तोडून मोडून टाकले? ज्या पक्षाबरोबर निवडणूक लढवली त्याच्या पाठित कसा खंजीर खुपसला, ही लफंगेगिरीच आहे”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं.
“जी काही सत्ता मिळवण्यासाठी बेईमानी केलेली आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलंय. त्यामुळे जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. फक्त एवढंच सांगतो, सरकार एवढ्या वेगवान गतीने काम करतंय ते पाहून त्यांनी धास्ती घेतलीय. त्यामुळे जे घरात होते ते बाहेर आले, बाहेरचे रस्त्यावर आले आणि मोर्चात आले, आनंद आहे, चांगलं आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“जे आपल्या हिंदू देवदेवतांना शिव्या घालणारे, सावरकरांना अपमान करणारे हे व्यासपीठावर होते हे महाराष्ट्राचं दुर्देवी आहे”, असंही ते म्हणाले.
“एवढ्या चार बैठका घेतल्या. तरी मोर्चा यशस्वी करता आला नाही. मला आठवतं आम्ही क्लस्टरवर मोर्चा काढला होता. आझाद मैदानात तो मोर्चा काढला होता. याशिवाय काल कोकणात झालेल्या सभेतही मोर्चापेक्षा जास्त माणसं होती”, असा दावा त्यांनी केला.