आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. पण एकनाथ शिंदे यांनी नाव सांगितलेलं नाही. ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांना महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तुम्हीच असणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “बघा. मी काम करतोय. कुठलं फळ मिळेल, या अपक्षेने मी काम केलं नाही. मला काय मिळेल, यापेक्षा मी राज्याला काय देईन, हे मी पाहिलं. माझ्या मुख्यमंत्रीपदाचा आणि राज्य सरकारला काय फायदा होईल हे मी पाहिलेलं आहे. आम्ही टीम म्हणून मिळून काम करतोय. टीम म्हणून काम करत राहणार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
“दुसरीकडे काय सुरु आहे ते आपल्याला माहिती आहे. मला करा असं दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हटलं जात आहे. काल परवा मी वाचलं की, कुठतरी कुणी ओरडलं की काय आणि चेहरे पडले, अशी गोष्ट आहे. आजी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आपण पाहतो. आरशातले मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहतोय. तो लभा मला नाहीय. मी टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून काम करणार. माझा उद्देश एवढाच आहे की, शासनाचा जनतेला फायदा व्हायला पाहिजे”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
“सगळ्यात आधी मी आपल्याला धन्यवाद देतो की, आपण महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रम आयोजित केला. चॅनलवर बातमी देताना विकास हा देखील महत्त्वाचा टप्पा असतो. आपण आज त्याला प्राधान्य दिलं आहे. जून २०२२ ला सरकार स्थापन झालं होतं. सर्व प्रकल्प बंद होते. सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व प्रकल्पांना आपण गती दिली. मेट्रो, रेल्वे प्रकल्पांबरोबर सिंचनाचे प्रकल्प केले. दुष्काळग्रस्त भागात पाणी वळवण्याचं काम केलं. आम्ही आतापर्यंत 122 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. याआधी एकही प्रकल्प मंजूर झाला नव्हता”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
“एकीकडे विकास होता, पायाभूत सुविधांचे प्रकल्प होते, दुसरीकडे या राज्याला उद्योह क्षेत्रात पुढे नेणं हे आमचं टार्गेट होतं. मी दावोसला गेलो होतो मला आठवतं. त्यावेळेस १ लाख ३७ हजार कोटींचे एमओवू झाले. दुसऱ्या टप्प्यात दावोसला गेलो तेव्हा साडेतीन लाखांचे एमओवू साईन झाले. फक्त कागदावर नाही तर 5 लाख कोटींच्या करारनामातून आम्ही कंपन्यांना अनुदान दिलं. आम्ही कालच्या कॅबिनेटमध्येमध्ये सेमीकंडक्टरसाठी घोषणा केली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मला एक आनंद आहे की, लोकांनी सुरुवातीच्या काळात विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. करारनामा करताना मोदींना श्रेय दिलं पाहिजे. ते विचारायचे की, केंद्र आणि राज्य सरकारचं समन्वय कसं आहे? आम्ही सांगितलं डबल इंजिन सरकार आहे. मागितल्याशिवाय घरी बसून काही मिळत नाही. ते मागायला हवं. आम्ही दिल्लीत गेलो आणि मागितलं. राज्यात योजना आणल्या. आम्ही लेक लाडकी लखपती योजना सुरु केली. ही योजना आम्ही अगोदरच केली होती. यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले
“सर्वात महत्त्वाचं बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणली. असं करणारं हे पहिलं राज्य आहे. आता १० लाखांपैकी दीड लाख तरुणांनी अर्ज भरले आहेत. लाडक्या बहीणीच्या बातम्यांखाली ते थोडं दबून गेलं आहे. आम्ही वयश्री योजना सुरु केली. ज्येष्ठांना महिन्याला ३ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. मुलींना उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला. मला रात्री साडेबारा वाजता समजलं की एका मुलीने शाळेच्या फीसाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली. त्यामुळे हा निर्णय घेतला. मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलणारं महाराष्ट्र सरकार हे पहिलं राज्य आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी प्रसिद्ध झाली की विरोधकांना अडचण होणार आहे. अडीच वर्षात उद्योग क्षेत्रात, परदेशी क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणलं. ५२ टक्के उद्योग आपल्याकडे आहे. स्वच्छता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. आपल्या राज्याबद्दल अभिमान असला पाहिजे. खरं आहे ते बोललं पाहिजे. टीका करणाऱ्या विरोधकांना ते शोभत नाही”, असं एकनाथ शिंदे विरोधकांना उद्देशून म्हणाले.