राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होण्यासाठी फक्त १ दिवस बाकी आहे. ५ डिसेंबरला आझाद मैदानात नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. पण अजूनही भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचं नाव घोषित करण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील असं भाजपचे नेते म्हणत असले तरी त्यांच्या नावाची घोषणा अजून झालेली नाही. दुसरीकडे काळजावाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काहीसे नाराज असल्याची शक्यता आहे. गेल्या २ दिवसांपासून ते आपल्या गावी गेले होते. पण नंतर तब्येत खराब झाल्याने ते ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात पोहोचले. तेथे त्यांनी काही चाचण्या केल्यानंतर वर्षा बंगल्यावर पोहोचले.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी येताच बैठकां सुरु केल्या आहेत. आता अशी ही बातमी आहे की, त्यांनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलवली आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी कोणाचीही भेट घेतली नाही. काल भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं महाजन यांनी सांगितलं. त्यानंतर आज ते पुन्हा एकदा शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.
गेले काही दिवस शिंदे आपल्या गावी होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण आज पुन्हा एकदा ते सक्रीय झाले आहेत. त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. आता आमदारांच्या बैठकीत ते नेमकं काय बोलतात. काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे हे गृहमंत्री होण्यासाठी इच्छूक आहेत पण भाजप गृहमंत्रीपद सोडायला तयार नाही.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वर्षा बंगल्यावर पोहोचल्यानंतर आता नेते त्यांना भेटण्यासाठी पोहोचत आहेत. जागावाटपाचा पेच अजून कायम आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.