राज्यातील घडामोडीचे केंद्र पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगला ठरला आहे. मंगळवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांची बैठक झाली. अंदाजे दीड ते दोन तास झालेल्या बंद दाराआडच्या या बैठकीत राज्यातील राजकारणासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. अर्थसंकल्पीय महाविकास आघाडीला कसे कोंडीत पकडावे, त्याची रणनीती यावेळी तिन्ही नेत्यांनी निश्चित केल्याची माहिती मिळाली.
राज्याच्या विधिमंडळाचे शुक्रवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीचा विश्वास वाढलेला असणार आहे. महाविकास आघाडी आक्रमक असणार आहे. विरोधक विविध मुद्यांवर आक्रमक असणार आहे. त्यांच्याकडून सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल. त्याला महायुती म्हणून कसे सामोरे जायचे? विरोधकांना सडेतोड उत्तर कसे द्यावे, यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य विधिमंडळाचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे कोणते निर्णय घ्यावे, अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी हव्या, त्यावर चर्चा होणार आहे. तसेच विरोधकांकडून खोटा नेरेटिव्ह पसरावला जात आहे. त्याला उत्तर कसे द्यावे, यावर चर्चा झाली. राज्यपाल नियुक्ती विधान परिषद सदस्य आणि मंत्रीमंडळ विस्तार यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात ते काय माहिती देणार? कोणती मोठी घोषणा करणार? याकडे लक्ष लागले आहे.
महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये वाद टाळले जावे. सर्व निर्णयांवर समन्वय हवे, त्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रिपणे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे ठरवण्यात आले. अधिवेशन सुरु असताना विधान परिषदेतील चार जागांचे निकाल येणार आहे. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटणार आहे. विधान परिषदेत महायुतीचे बहुमत आहे.