गिरीश गायकवाड, मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधित 156 जागांवर विजय मिळाल्यानंतर आता तिथे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय. भाजपला गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 पैकी 156 जागांवर यश मिळाल्याने भाजपचा ऐतिहासिक विजय झालाय. त्यामुळे तिथे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याच नेतृत्वात पुन्हा नवं सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट आहे. विशेष म्हणजे नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 12 डिसेंबरला सोमवारी आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या नव्या सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. NDAचा मित्रपक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांना भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलंय.
एकनाथ शिंदे यांना शपथविधीचं निमंत्रण आल्यानंतर महाराष्ट्रात सर्वसामान्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्रात चार महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं. सत्तांतरापूर्वी महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार होतं.
राज्यात आज महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आज कदाचित गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण शिंदे यांच्या ऐवजी ‘मातोश्री’ निवासित उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं असतं, अशी चर्चा सुरुय.
दरम्यान, भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.