मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. हा वाद मिटवण्यासाठी राज्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बच्चू कडू आणि रवी राणा यांना समोरासमोर बसून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कडू आणि राणा यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या महाराष्ट्राच्या राज्यात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडी पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी वेग धरण्याची दाट शक्यता आहे. कारण शिंदे गटाच्या 50 आमदारांना पुन्हा गुवाहाटीला नेलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्रात तीन महिन्यांआधी महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात होतं. त्यावेळी एकनाथ शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री होते. पण शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी केली आणि तब्बल 40 शिवसेना आमदारांना घेऊन सत्तेबाहेर पडले. त्यांच्यासह मित्रपक्ष आणि अपक्ष अशा 10 आमदारांनी देखील सत्तेतून काढता पाय घेतला होता. हे सर्व आमदार महाराष्ट्रातून सूरत आणि नंतर गुवाहाटीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतरच ते पुन्हा राज्यात आले होते. शिंदे गटाच्या या सर्व 50 आमदारांचा गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला होता. कारण शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांचा फोनवरील संभाषणाचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी “काय झाडी, काय डोंगार, एकदम ओक्केमध्ये आहोत”, असं विधान केलं होतं. त्यांचं हेच विधान चर्चेला कारण ठरलं होतं.
या सगळ्या घडामोडींना आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे तीन महिन्यांनी शिंदे गटाचे सर्व पन्नास आमदार पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यातील नवं सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटले तरी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही. या दुसऱ्या टप्प्याकडे अनेक आमदारांचं लक्ष आहे. कारण अनेक आमदारांना मंत्रिपदाची आशा आहे. दुसऱ्या टप्प्यातील विस्तार लवकर होत नसल्याने बच्चू कडू कदाचित नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांची सर्व नाराजी दूर होणार असं वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कॅबिनेट विस्तारही लवकर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय महामंडळाचादेखील फॉर्म्युला ठरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शिंदे गटाच्या 50 आमदारांना पुन्हा गुवाहाटीला नेलं जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जेव्हा अयोध्या दौरा केला होता तेव्हा शिवसेनेच्या काही आमदारांना विमानातून उतरवण्यात आलं होतं. त्यामुळे यावेळी एकनाथ शिंदे सर्व आमदारांना अयोध्येला घेऊन जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुढच्या महिन्यात दोन नियोजित दौरे आहेत. एक म्हणजे गुवाहाटीचा कामाख्या देवीच्या दर्शनासाठीचा दौरा आणि दुसरा म्हणजे अयोध्या दौरा. या दोन्ही दौऱ्याकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे नेमक्या काय-काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.