मुंबई : दोन दिवसांपूर्वीचा राज्यात मोठं सत्तांतर पार पडलंय. या सत्तातरानंतर नव्या मंत्रिमंडळासाठीही (Cabinet) लगबग सुरू आहेत. राज्यात अनेक आमदार हे नव्या मंत्रिमंडळात बसण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर शिंदे गटातील (Eknath Shinde) दोन नेत्यांची केंद्रातही मंत्रिपदी वर्णी (Central Minister) लागणार आहे. शिवसेना आणि भाजपची युती होती तेव्हा शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी तयार झाल्याने अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता. मात्र आता शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपचं सरकार राज्यात स्थापन झाल्याने या गटाला दोन मंत्रिपद केंद्रात मिळणार आहेत. या दोन्ही मंत्रिपदासाठी जी नावं चर्चेत आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. शिंदे गटाकडून केंद्रात मंत्रिपदासाठी दीपक केसरकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे.
खासदार श्रीकांत शिंदे हे तर एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत. तसेच ते केंद्रात खासदार असल्याने त्यांच्या मंत्रिपदाचा मार्ग सोपा आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातलं एकनात शिंदे यांचं वर्चस्व पाहता आगाडी निवडणुका लक्षात घेऊन श्रीकांत शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. तसेच श्रीकांत शिंदे यांच्याकडे तरुण नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. या विभागातील तरुणाईत श्रीकांत शिंदे यांची क्रेझ मोठी आहे. त्यामुळे बंडाच्या काळात श्रीकांत शिंदे यांनी याठिकाणी राहून ठाकरेंच्या समर्थनार्थ असणाऱ्या नेत्यांना टक्कर देत आपलं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. श्रीकांत शिंदे यांच्या गाडीवर उभे राहून केलेल्या भाषणाचीही बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे या नावाची वर्षी लागण्याची जास्त शक्यता आहे.
दीपक केसरकर हे शिंदे गटाचे अधिकृत प्रवक्ते आहेत. तसेच केसरकर यांना शिंदे गट आणि भाजपमधील दुवा म्हणून पाहिलं जातं. बंडाच्या काळत त्यांचा मिळालेला पाठिंबा आणि संयम पाहता त्यांचीही वर्णी ही केंद्रीय मंत्रिमंडळात लागू शकते. तसेच शिंदे गटातले सर्वात वजनदार, अनुभवी नेतेही दीपक केसरकर हेच आहेत.
केंद्रातल्या मंत्रिपादासाठी फक्त शिंदे गटातीलच नाही तर शिवसेनेतील दुसऱ्या एखाद्या बड्या नेत्याची वर्षी लागू शकते. शिवसेनेचे अनेक बडे नेते हे सध्या खासदार पदावर विराजमान आहे. त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यास त्यांचाही पाठिंबा शिंदे गटाला वाढू शकतो असेही बोलले जात आहे.