Eknath Shinde Medical Report: महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. परंतु महायुतीचे नेते आणि हंगामी मुख्यमंत्री एकनाथ आजारी आहेत. त्यांची प्रकृती अजूनही बरी नाही. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज आहे. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक सुरू आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात त्यांना अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना आता ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करणार आहे. त्यांचे सीटी स्कॅनही करण्यात आले. तसेच एक्स-रे काढण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत महायुतीच्या बैठकीसाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा या बैठकीला होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे मुंबईला परत न येते थेट साताऱ्यातील आपल्या दरेगावी गेले. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. दरेगावात ते आजारी असल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
दरेगाववरुन दोन दिवसांत एकनाथ शिंदे ठाणे येथील निवासस्थानी आले. त्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाली नाही. आता ज्युपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी ते ज्युपिटर रुग्णालयात पोहचले आहे. यापू्र्वी त्यांची डेंग्यूचा चाचणी केली होती. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांना अशक्तपणा असल्याची डॉक्टरांनी सांगितले. यामुळे त्यांना पुन्हा आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नसल्याने आज ही एकनाथ शिंदे कुठेही बैठकीला जाणार नाही. मात्र दुपारी महापरिनिर्वाहादिन निम्मित अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीला व्हिसीद्वारे उपस्थित राहणार आहेत.
एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी शिवसेना नेते आणि आमदार ठाण्यात येत आहेत. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी आले. तसेच शिवसेना नेते भरत गोगावले एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले. यावेळी भरत गोगावले यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत बैठक झाली. दुसरीकडे गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.