मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडणार? याचा काही अंदाज बांधता येणार नाही. कारण महाराष्ट्रात सध्याच्या घडीला अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडलेली आहे. शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक गट भाजपसोबत सत्तेत आहे. सत्ताधारी पक्षांच्या गोटात सध्या अनेक हालचाली घडत आहेत. विशेष म्हणजे तीनही सत्ताधारी पक्षांचे प्रमुख नेत्यांच्या आता महत्त्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ही बैठक पार पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला आता उद्या मोठी नवी बातमी मिळणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
राज्यात सत्तांतर होऊन आता वर्षभरापेक्षा जास्त काळ उलटला आहे. पण अजूनही मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही. शिवसेनेचे अनेक आमदार मंत्रिपदाची आशा बाळगून आहेत. काही आमदारांनी अनेकदा सरकारला इशारा देखील दिला आहे. अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आता सत्तेत अजित पवार यांचा गटदेखील सहभागी झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये धुसफूस असल्याची माहिती समोर आली होती.
एकनाथ शिंदे यांच्या गटाचा अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास विरोध असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात यश आल्याची माहिती समोर आली होती. अजित पवार यांच्याकडून निधी देण्यास दुजाभाव होणार नाही, असं आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता तीनही बड्या नेत्यांची ‘वर्षा’वर बैठक पार पडत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तीनही नेत्यांमध्ये खातेवाटप आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होत आहे. कोणत्या पक्षाला कोणतं खातं द्यावं आणि कोणत्या नेत्याला मंत्रिपद द्यावं, याबाबत या बैठकीत खलबतं होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीकडे सत्ताधारी आमदारांचं लक्ष असणार आहे. कारण या बैठकीनंतर महाराष्ट्राला नवे मंत्री मिळणार आहेत. त्यामुळे कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.