ज्युपिटरवरून थेट ‘वर्षा’वर… एकनाथ शिंदे आज आणि उद्या धडाधड निर्णय घेणार?

| Updated on: Dec 03, 2024 | 4:45 PM

एकनाथ शिंदे आजारपणातून बाहेर पडल्यानंतर आज 'वर्षा' निवासस्थानी दाखल झाले आहेत. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा येत्या 5 डिसेंबरला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आज आणि उद्या धडाधड निर्णय घ्यावे लागणार आहेत.

ज्युपिटरवरून थेट वर्षावर... एकनाथ शिंदे आज आणि उद्या धडाधड निर्णय घेणार?
ज्युपिटरवरून थेट 'वर्षा'वर... एकनाथ शिंदे आज आणि उद्या धडाधड निर्णय घेणार?
Follow us on

महायुती सरकारच्या शपथविधीला आता केवळ दोन दिवस बाकी आहेत. या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार ते पाच दिवसांपासून आजारी असलेले एकनाथ शिंदे आता अ‍ॅक्शन मोडवर आलेले बघायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. तिथे त्यांच्यावर तपासणी झाली. त्यांच्या घशात संसर्ग झालाय. तसेच त्यांना सातत्याने ताप येतोय. त्यामुळे त्यांना अशक्तपणा देखील जाणवत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी देखील वाढल्याची माहिती आहे. या सगळ्या कारणास्तव एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची आज पूर्ण तपासणी करण्यात आली. त्यांच्या छातीचा सीटी स्कॅन आणि एमआरआय देखील काढण्यात आल्याची माहिती आहे. सर्व रिपोर्ट आता नॉर्मल असल्याची माहिती आहे. त्यांची डेंग्यू आणि मलेरियाचीदेखील चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी केली आणि रिपोर्ट बघितल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देता येईल, असा सल्ला दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे काही वेळाने ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी केवळ तीन वाक्यात प्रतिक्रिया दिली. “माझी तब्येत चांगली होती. चेकअपसाठी आलो होतो. माझी प्रकृती उत्तम आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. यानंतर एकनाथ शिंदे आपल्या गाडीत बसले आणि त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेला रवाना झाला.

एकनाथ शिंदे धडाधड निर्णय घेणार?

एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयातून निघाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. महायुती सरकारचा शपथविधी येत्या दोन दिवसांत होणार आहे. येत्या 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या गोटात जोरदार तयारी सुरु आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे गेल्या चार दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या आजारपणामुळे शिवसेनेची बैठक पुढे ढकलण्यात आली होती. या दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली होती. यानंतर एकनाथ शिंदे आज ज्युपिटर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन मुंबईत वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे शपथविधीआधी केवळ दोन दिवस आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आता धडाधड निर्णय घ्यावे लागणार आहेत.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे काय-काय निर्णय घेणार?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची बैठक पार पडली होती. यावेळी सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांची सर्नानुमते गटनेता म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीसाठी गेले होते. त्यानंतर ते मुंबईत आले होते. नंतर लगेच ते दरेगावात गेले होते आणि आजारपणामुळे ते दोन दिवस दरेगावात मुक्कामी होते. यानंतर ते ठाण्यात आले. पण आजारपणामुळे त्यांच्या सर्व बैठका रद्द झाल्या होत्या. आता एकनाथ शिंदे आज आमदारांची बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत कुठला आमदार मंत्री होणार, येत्या 5 डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ कोण घेणार, कुणाला कोणती खाती दिली जाणार? याबाबतचे महत्त्वाचे निर्णय एकनाथ शिंदे आज आणि उद्या घेणार असल्याची माहिती आहे.