मुंबई : शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आधी मुलगा राज सुर्वेमुळे अडचणीत आलेले आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप झाला आहे. भाजपा कार्यकर्त्याकडून खंडणी मागितल्या आरोप त्यांच्यावर झाला आहे. भाजपा कार्यकर्त्यांना शिंदे गटातील आमदार टॉर्चर करतात का? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. प्रकाश सुर्वे यांनी भाजपा कार्यकर्ते साहेबराव पवार यांच्याकडे खंडणी मागितल्याच समोर आलय असं वडेट्टीवार म्हणाले.
गृहमंत्री, शिंदे गटातील आमदारांवर कारवाई का करत नाहीत? असा सवाल त्यांनी केला. डेब्रिज टाकण्याची पालिकेची परवानगी असतानाही आपल्याकडे खंडणी मागितली, असा आरोप साहेबराव पवार यांनी केला आहे.
आरोपांवर प्रकाश सुर्वे काय म्हणाले?
दरम्यान आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्यावरील खंडणी मागितल्याचा आरोप फेटाळला आहे. मला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत, असं प्रकाश सुर्वे म्हणाले. साहेबराव पवार भूमाफिया असून आणि नागरिकांच्या तक्रारीमुळे कारवाईसाठी पत्र दिल्याच प्रकाश सुर्वे यांनी सांगितलं. साहेबराव पवार यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा करणार, असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी काय प्रश्न विचारला?
“प्रकाश सुर्वे यांनी भाजपा कार्यकर्त्याकडे खंडणी मागितली, यातून सत्तेत किती आलबेल आहे याच हे उद्हारण आहे. या आमदारावर शासन काय कारवाई करणार? भाजपा कार्यकर्त्याला या पद्धतीने टॉर्चर केलं जातय, भाजपा या आमद्रारावर कारवाईसाठी मागणी करणार का?” असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
राज सुर्वेवर आरोप काय?
एका म्युझिक कंपनीचा मालक राजकुमार सिंह अपहरण प्रकरणात वनराई पोलीस आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्या शोधात आहेत. आतापर्यंत केवळ तीन जणांना अटक केली आहे. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेसह इतर सर्व आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आहे.