मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात अनेक किस्से येत असतात. मध्यरात्री भेट देऊन ते आलेल्या व्यक्तीचे प्रश्न मार्गी लावत असतात. कधी व्यासपीठावरुन निधी देण्याचे आदेश देतात. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक किस्सा समोर आला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना जनतेच्या तातडीच्या कामांना प्राधान्य देतात. कल्याणमधील एका रुग्णास विशेष बाब म्हणून मदत देण्याचे आदेश निवडणुकीच्या प्रचार रथावरुन त्यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठल्याही कामासाठी थांबण्याची गरज नाही. तात्काळ निर्णय घेऊ असे नेहमी म्हणतात. त्याची प्रचिती पुन्हा आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर दौरे करत आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ते आले होते. कल्याणमध्ये रॅली सुरू असताना एक रुग्ण त्याच्या नातेवाईकांसह उपस्थित होता. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदत करतील, हा विश्वास होता. त्यामुळे मुख्यमंत्री प्रचार रथात असताना त्यांनी आवाज देत मदतीची मागणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांना प्रचार रथावर बोलावून घेतले. रुग्णाला तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले. त्या रुग्णाच्या अर्जावर प्रचार रथातूनच सही केली. त्यांनी विशेष बाब म्हणून स्वाक्षरी केली आणि तत्काळ मदत देण्याचे आदेश दिले. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदूरबार दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत रघुवंशी यांचे भाषण सुरू होते. त्यांनी भाषणात नवीन इमारतीसाठी ७ कोटी २८ लाखांचा निधी राज्य शासनाकडून अद्यापही मिळाला नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात फोन करत रखडलेला निधी वाटप करण्याचे आदेश दिले. त्यांच्या फोननंतर केवळ ३ मिनिटांनी अधिकाऱ्यांनी आदेश काढले होते.