मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीच चर्चेत असतो. पण शिवसेना पक्षात सध्या फूट पडलीय. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान मिळावं यासाठी दोन्ही गटांकडून मुंबई महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आला होता. दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क मैदानावर मेळावा होईल, असा दावा केला जात होता. अखेर शिंदे गटाने माघार घेतली आहे. शिंदे गट आझाद मैदानात दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी आज ट्विटरवर सविस्तर भूमिका मांडलीय. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा देखील साधलाय.
“बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
“बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. पण, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती”, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलंय.
“बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
“कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार?”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय.