‘तिसराच माणूस आमच्यात संभ्रम निर्माण करायचा’, वायकरांच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Mar 10, 2024 | 10:09 PM

रवींद्र वायकर यांनी आज अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी वायकर यांनी आपण धोरणात्मक निर्णयासाठी, मतदारसंघातील कामांसाठी शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं स्पष्ट केलं. तर एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

तिसराच माणूस आमच्यात संभ्रम निर्माण करायचा, वायकरांच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
Follow us on

मुंबई | 10 मार्च 2024 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. काही लोक आमच्यात गैरसमज निर्माण करत होते. पण आम्ही एकत्र बसलो तेव्हा आमच्यातला संभ्रम दूर झाला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांनी वायकरांचं स्वागतही केलं. “रवींद्र वायकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. रवींद्र वायकर यांनी गेली 40 ते 50 वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहून शिवसेनेत काम केलं आहे. खरं म्हणजे मी काय, ते काय, इतर आपले पदाधिकारी काय, गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार पूर्ण राज्यभरात पोहोचवण्याचं काम आणि 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा बाळासाहेबांनी मंत्र दिला, त्याचं पालन आम्ही अनेक वर्ष करत आलो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“रवींद्र वायकर यांचं आज संपूर्ण कुटुंब येथे उपस्थित आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी स्वागत करतो. रवींद्र वायकर यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न बैठकीत सांगितले आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचं पर्व, या देशाला उच्च स्थानाला किंबहुना या देशाचं नाव आदराने सन्मानाने घेतलं जातं, ते मोदी यांच्या कर्तृत्वामुळे. केंद्र सरकारच्या आणि राज्यात महायुतीच्या माध्यमातून जो विकास होतोय, आपण जे निर्णय दीड वर्षात घेतले त्याचे परिणाम वायकर यांच्यावर झालेला आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. शेवटी आपल्याला ज्या मतदारांनी निवडून दिलं आहे त्यांना न्याय देणं महत्त्वाचं असतं”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

‘तिसराच माणूस संभ्रम निर्माण करायचा’

“सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही काम करत असतो. आपल्या मतदारसंघातील कामे झाली पाहिजेत म्हणून त्यांनी आज आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर माझे आणि त्यांच्याबद्दलचे समज गैरसमज काही लोकं निर्माण करत होते. आमच्यामध्ये एकमेकांबद्दल जो संभ्रम होता तो गेला आहे. आम्ही एकत्र बसल्यानंतर तो संभ्रम गेला आहे. तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता”, अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.

“एकनाथ शिंदे कोण आहे? सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. 40 अधिक 10 असे 50 आमदार आणि 13 खासदारांनी विश्वास ठेवला आहे. राज्यभरातून दरदिवशी जिल्हा-जिल्ह्यातून तालुका-तालुक्यातून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ते एका विश्वासामुळे प्रवेश करत आहेत. कारण मी एकदा शब्द दिला तर शब्द दिला. तो शब्द मी फिरवत नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“माझ्याबद्दल लोकांच्या मनात विश्वास आहे. त्यामुळे आपण भाजप-शिवसेना युतीचं सरकार बनवलं. युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या होत्या. युती म्हणूनच सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं असं महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं मत होतं. पण दुर्देवाने ते झालं नाही. दीड वर्षांपूर्वी आम्ही ते घडवून आणलं. लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. आम्ही ऐतिहासिक 500 निर्णय लोकांसाठी घेतले. यामध्ये सर्व घटकांसाठी निर्णय घेतले”, असंदेखील एकनाथ शिंदे म्हणाले.