‘बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैचारिक दगाबाजी करणाऱ्यांची…’, एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्टमधून ठाकरेंना डिवचलं

| Updated on: Jun 30, 2024 | 4:38 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फेसबुकवर पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमधून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे सरकारला स्थापन होऊन आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांनी नागरिकांचे आभारही मानले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैचारिक दगाबाजी करणाऱ्यांची..., एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्टमधून ठाकरेंना डिवचलं
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर भूमिका मांडली आहे. शिंदेंनी या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. “मंगल आणि पवित्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दोन वर्षांपूर्वी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. जनतेची साथ, विश्वास हेच माझे संचित आहे. तुमच्या प्रेमाच्या, आशीर्वादाच्या बळावर आणि सहकाऱ्यांच्या विश्वासावरच मी राज्याचे नेतृत्व करत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैचारिक दगाबाजी करीत, ज्यांनी असंगाशी संग केला होता, त्यांची साथ सोडून आम्ही जनतेच्या मनातले सरकार स्थापन केले, त्याला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

‘राजकीय वारसा हा केवळ रक्ताने नाही तर…’

“दोन वर्षांतील विकासाचा आणि विश्वासाचा आलेख जनतेसमोर आहेत. तो या व्यासपीठावर मांडण्यासाठी जागा कमी पडेल. पण, शिवसेनेच्या भगव्याचे, बाळासाहेबांच्या विचारांचे पावित्र्य राखण्याचे शिवधनुष्य आम्ही यशस्वीरित्या पेलले आहे, याचा सर्वाधिक अभिमान आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा मंत्र जपत लोकहिताचा ध्यास घेतला, याचे समाधान आहे. राजकीय वारसा हा केवळ रक्ताने नाही तर कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो हे मी आणि शिवसेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत दाखवून दिलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘खरी शिवसेना कुणाची वाद…’

“शिवसेनेच्या सर्व पाठीराख्यांनी, मतदारांनी आम्ही घेतलेल्या या भूमिकेला आणि निर्णयाला भक्कम पाठिंबा दिल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी सिद्ध झाले आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हा गेले दोन वर्षे सुरू असलेला वादही मिटला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा हा पाठिंबा अधिक भक्कम होईल आणि पुन्हा एकदा महायुती राज्यात दिमाखात सत्तेवर येईल, असा मला विश्वास आहे. सर्वसामान्य माणसाने सरकारवर दाखवलेला विश्वास हीच महायुती सरकारची खरी कमाई आहे. या विश्वासाचे ऋण फेडण्यासाठी आणि हा विश्वास जपण्यासाठी शिवसेना सदैव सज्ज असेल. तत्पर असेल ही ग्वाही देतो. महाराष्ट्रातील जनतेच्या कायम ऋणात राहीन”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री आणखी काय-काय म्हणाले?

शिवसेनाप्रमुखांचा विचार जपण्यासाठी स्थापन झालेल्या या सरकारने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कणखर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्षे महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन अहोरात्र काम केले. त्यातूनच जनतेचा विश्वास आम्ही कमावला, याचे आज समाधान आणि आनंद आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवकांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यातूनच गेल्या दोन वर्षांत अनेक कल्याणकारी निर्णय घेणे शक्य झाले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“याच आठवड्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीजसवलत योजना, युवकांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत देणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि ज्येष्ठांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडविणारी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या जनतहिताच्या योजनांनी महायुती सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीवर कळस चढवला, याचे अतीव समाधान आहे. सर्व समाज घटकांना, सर्वच क्षेत्रात न्याय देण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांत अविरत प्रयत्न केले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा, नमो शेतकरी महासन्मान योजना, पाच लाखांचा आरोग्य विमा देणारी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, सर्वसामान्यांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, महिलांना आत्मबळ देणाऱ्या बचतगटांची वाढवलेली संख्या, लाखमोलाची लेक लाडकी लखपती योजना, निसर्गाचा कोप झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत अशा शेकडो योजना आम्ही राबवल्या. ज्येष्ठांना आणि महिलांना प्रवास भाड्यात दिलेल्या सवलतीमुळे एसटीची चाके गाळातून बाहेर आली आणि महिलांच्या आत्मविश्वासालाही बळ मिळाले. विकासासोबत या राज्याचा समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाही आपले सरकार जपतेय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“महायुती सरकारने राबवलेल्या काही उपक्रमांकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आणि इतर राज्यांकडून या योजनांचा तपशील मागवला गेला. त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती ‘शासन आपल्या दारी’ या कल्पक योजनेची. योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत नेण्याचे आमचे हे व्रत होते. सामान्य माणसांचे कष्ट आणि धावपळ वाचवण्यासाठी महायुतीने थेट सरकारलाच लोकांच्या दारापर्यंत नेले. नागरिकांना दिलासा आणि योजनाधार मिळाला. आर्थिक आणि सामाजिक मागास घटकांसाठी शिक्षणात सलवत, शैक्षणिक कर्जे, वसतिगृहे, परवडणाऱ्या लाखो घरांची उपलब्धता यातून प्रत्येक समाज घटकाला आनंद आणि समाधान देण्यासाठी सरकारने गेल्या दोन वर्षांत अनेक निर्णय घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजवणीही केली”, असं शिंदे म्हणाले.

“आज पायाभूत सविधा प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मुंबईतील किनारा महामार्ग, महानगरांमधील मेट्रोचे जाळे यांमधून आर्थिक-औद्योगिक विकासाची गतीही सरकारने राखली आहे. महाराष्ट्र हे देशातले सर्वाधिक परकीय गुंतवणूक झालेले राज्य ठरले आहे. महाराष्ट्र आज पुन्हा उद्योगस्नेही राज्य झाले आहे. आधीच्या सरकारची कुलूप संस्कृती मोडून काढत विकास, गुंतवणुकीला वेग आला. गेल्या दोन वर्षांत पाच लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली, याचा सार्थ अभिमान आहे. या विकास पर्वात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांची समर्थ आणि खंबीर साथ मला लाभली. सर्व सहकाऱ्यांचा विश्वास मिळाला, हे मी माझे भाग्य समजतो”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.