निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर पश्चिम येथील कासारवाडी स्वच्छता कामगार वसाहतीला भेट दिली आहे. त्यांनी तिथे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. तसेच स्वच्छता कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी सण साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 ऑक्टोबरला या वसाहतीला भेट देऊन कायापालट करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर या ठिकाणी जोरदार कामाला सुरवात झालीय.
“ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस घेऊन येवो. निरोगी दिवाळी होवो. या छोटेखानी कार्यक्रमाला सर्व नेत्यांनी उपस्थिती लावलीय. खासदार, आमदार, सर्व कर्मचारी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! इथे एका महिन्यापूर्वी मी आलो होतो. 2 ऑक्टोबरला. स्वच्छ भारत अभियानासाठी आपण सगळे मोहीम हाती घेतली होती. सर्व सफाई कर्मचारी काम करत होते तेव्हा मनात विचार आला, संपूर्ण मुंबई स्वच्छ करणारे हे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था आहे हे पाहावं. इथं आलो. पालिका आयुक्त सोबत होते. सुधाकर शिंदे, संपूर्ण टीम, सगळे सोबत होते. इथे सर्वांना गार्डन, मैदान अभ्यासिका गरजेची होती. आपला दवाखाना हवा होता. शौचालयाची पाहणी केली”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“इथं एका घरी चहा घेत होतो. डोक्याला पत्रा लागत होता. मी विचार केला यांचं कसं होणार? आता काम प्रगतीपथावर आहे, चांगली घरं त्यांना मिळतायत. घराच्या फ्लोरिंगपासून डागडुजीची सर्व कामं होणं गरजेचं होतं. आज आल्यानंतर वाटलं आपण ठरवलं तर चमत्कार होऊ शकतो. आता तर सुरुवात आहे. पुढच्या दोन-तीन महिन्यात ठरवलेली सर्व कामं पूर्ण होतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 40 वर्षांपूर्वी इथं येऊन गेले. त्यानंतर कुणाला वेळ मिळाला नाही. मला मिळाला, मी आलो”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
“या मुंबईची स्वच्छता, आरोग्य अबाधित ठेवण्याचं काम हे कर्मचारी करतात. या माणसांचं कुटुंब आहे, इतर मुलांप्रमाणे उच्चशिक्षण घेता आलं पाहिजे. UPSC, MPSC साठी देखील योजना आपण सुरू केलीय. या कर्मचाऱ्यांचा मुलगा उद्या IAS, IPS होऊ शकतो. या मुलांचं शिक्षण थांबू नये यासाठी हा ऐतिहासिक निर्णय पालिकेनं घेतला. दादर पूर्वेलाही गेलो. अशा 46 वसाहती आहेत जिथं असंच मॉडेलचं काम आपण करणार आहोत”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“कर्मचारी बाहेर असताना घरची काळजी त्याला नसावी हा उद्देश होता. मी म्हटलं होतं एका महिन्यानंतर पुन्हा येणार पाहणी करणार. मी दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री आहे. सर्वांना चांगल्या सुविधा मिळणं गरजेचं आहे. अभ्यासिका हवी, तिथं दवाखानाही हवा. आता रुग्णालयात जाण्याची गरज नाही. मोफत तपासणी आहे. थंडी, तापाच्या आजारावरही मोफत उपचार होतील. मुंबईत 200 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलेत. आणखी ५० करायचे आहेत”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“छोट्या आजारासाठी रुग्णालयात जाण्याची गरज नाही ही संकल्पना आपण राबवतोय. हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा म्हणजे हक्काची घरं. आमदार-खासदार त्यामागे आहेत तोपर्यंत असंच राहणार का? त्यासाठी या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. रस्ते चांगले होतील, गार्डन दिसतंय. शौचालय आता 5 स्टार क्वालिटीचं बनवलंय. घरांची उंची वाढेल. एक चांगली चाळ तयार होईल”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. न्याय दिला पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, तरुण, सर्व घटकांसाठी आपलं सरकार काम करतंय. काल गडचिरोलीत होतो. नक्षलांपासून सुरक्षित ठेवणाऱ्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. यापुढे शाळांनाही अपग्रेड करण्याचा प्रयत्न होईल. दीड लाखाची ज्योतिबा फुले योजना आता 5 लाखाची केलीय. आरोग्यावर भर देतोय. मुंबईतील जितकी रुग्णालयं आहेत ती चांगली झाली पाहिजेत यासाठी आपण लक्ष घालतोय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई शहर स्वच्छ करीत सुंदर ठेवण्यासाठी सर्वतोपरी कार्यरत असणारे सफाई कामगार नक्की कोणत्या परिस्थितीत जगतात ते पहाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 2 ऑक्टोबरला मुंबईतील स्वच्छता कामगारांच्या वसाहतींना भेट देऊन त्यांची पाहणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी दादर पश्चिमेकडील कासारवाडी आणि दादर पूर्वेकडील गौतम नगर परिसरातील सफाई कामगारांच्या वसाहतींना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी जे हात राबतात त्यांच्या घरांची, परिसराची, तेथील शौचालयांची पाहणी करून या गोष्टी ताबडतोब सुधारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई मनपा आयुक्तांना दिले.
मुख्यमंत्र्यांनी सफाई कामगारांच्या वसाहतींचा संपूर्ण कायापालट करण्यात यावा, असा आदेश दिला होता. तसेच गौतम नगर येथे रखडलेल्या कामगारांचा वसाहतीचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या वसाहतीतील सुविधांचा ताबडतोब स्वतंत्र टिमद्वारे आढावा घ्यावा आणि तिथे लवकरात लवकर सुधारणा घडवाव्यात, असे निर्देश दिले होते.
मुंबईकर नागरिकांचे आरोग्यासाठी जे हात राबतात त्यांना घराची काळजी घेण्याच्या हेतूने मुख्यमंत्र्यांनी गांधी जयंतीच्या दिवशी भेटून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीदिनी आगळी स्वच्छांजली अर्पण केली होती. मुख्यमंत्र्यांनी या वसाहतींना नुसतीच भेट देऊन पाहणी केली नाही तर या सफाई कामगारांनी आपुलकीने दिलेला चहाचा देखील स्वीकार केला होता. यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी वेलारासु तसेच मुंबई मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.