मुंबईः देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यात लागण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील प्रमुख घटकपक्ष शिवसेनेला अक्षरशः पोखरून काढत एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केलं आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलंय. शिंदेसेना आणि भाजप आता बहुमत चाचणीला सामोरंही जाईल. मात्र शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत पडलेली उभी फूट कशी भरून निघणार हा सध्या उद्धव ठाकरेंसमोरील मोठा प्रश्न आहे. भाजपने मोठी खेळी करत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ केलंय. आता या उपकारांमुळे एकनाथ शिंदेंचा पूर्ण गट पुढील निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात उतरणं कठीण दिसंतय. उरल्या सुरल्या शिवसैनिकांसोबत मुंबई महापालिकेवरील सत्ता टिकवण्याचं बळ आणायचं तरी कुठून, हा मोठा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर (Uddhav Thackeray) आहे. 45 हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न शिवसेनेला करावे लागतील.
उद्धव ठाकरेंसमोरचं आताचं मोठं आव्हान म्हणजे शिंदे आणि भाजपाची मैत्री. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारमध्ये असताना नगरविकास खातं सांभाळलं आहे. या काळात मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेत त्यांनी जातीने लक्ष घातलं होतं. आता शिंदेच भाजपाच्या गोटात गेल्याने शिवसेनेला नव्याने रणनीती आखावी लागेल. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊ शकत नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचा सामना करणं शिवसेनेला कितपत झेपेल, हे सांगणं कठीण आहे. मुंबई महापालिका हातची गेली तर शिवसेनेचं महत्त्वाचं तळ उध्वस्त होईल आणि याचा लाभ पुन्हा एकदा भाजपाला मिळेल.
काहीही करून महापालिकेची सत्ता गमवायची नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठरवलं तर काय होईल? एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोरांना शिवसेनेत पुन्हा सामावून घेतलं तरीही मोठा धक्का दिलेल्या बंडखोर शिंदे गटासोबत पुढील रणनीती आखणं उद्धव ठाकरेंना कितपत शक्य होईल, हे सांगता येत नाही. भाजपसोबत राज्यात सत्तेत असलेल्या शिंदेसेनेसोबत जळवून घेणं ठाकरेंसाठी कठीणच आहे.
एकनाथ शिंदे यांचं मुंबईत फार वजन नाही. आतापर्यंत एकनाथ शिंदे ठाणे महापालिका सांभाळायचे तर स्वतः ठाकरे परिवार मुंबई महापालिकेचा कारभार पहात. शिंदे गटात मुंबईतील सेनेचे दोन आमदार सामील आहेत. तसेच शिंदे आता बाहुबली नेते झाल्याने मुंबईतील अनेक नगरसेवकदेखील शिंदे गटाकडून तिकिट मिळवण्याचा प्रयत्न करती अन्यथा भाजपमध्ये जाणे पसंत करतील. त्यामुळे शिंदेंच्या बंडखोरीचे मोठे पडसाद मुंबई महापालिकेवर दिसू शकतात.