मुंबई : कोकणामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि नैसर्गिक हानी झाली. यात अनेकांची घरे, जनावरे या अतिवृष्टीमध्ये वाहून गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वास्तूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेकजण कोकणवासीयांसाठी मदतीचा हात देत आहेत. यात जे. जे. हॉस्पिटलमधील तृतीय श्रेणी संघटनेचाही समावेश झालाय. त्यांनी सामाजिक बांधिकलकी जपत जवळपास 27 हजार रुपयांचा निधी पाठवलाय.
कोकणातील नुकसानग्रस्त बांधवांना सढळ हस्ते मदत करून त्याचे कुटुंब पुन्हा उभे करण्यासाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मोहिम सुरू केली. त्याचाच भाग म्हणून मदतीसाठी आवाहन करण्यात आलं आणि 2 ते 3 दिवसात जे.जे. हॉस्पिटलमधील तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेने चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी संघटना म्हणजे एक कुटुंब आहे हे परत एकदा दाखून दिले. जे.जे हॉस्पिटलमधील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांनी 26 हजार 861 रुपये मदत निधी म्हणून संघटनेकडे जमा केले.
यासाठी संघटनेच्या सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींचे संघटनेच्यावतीने अध्यक्ष सुरेश तांबे, सरचिटणीस अरुण जाधव खजिनदार रामदास गोळे व संघटनेचे पदाधिकारी यांनी सर्व कर्मचारी वर्गाचे मनापासून आभार मानले. हा सर्व निधी बृहन्मुंबई राज्य सरकारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख, सरचिटणीस अविनाश दौंड यांना सुपूर्द करण्यात आला आहे.
“दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे अशीच परिस्थिती उद्भवली होती तेव्हा देखील संघटनेने कपडे, भांडी आणि शालेय उपयोगी वस्तू पाठवल्या होत्या. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे आदर्श नेतृत्व र. ग. कर्णिक यांनी घालून दिलेल्या आदेशानुसार संघटना नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकारी कर्मचारी नेहमीच अशी भरघोस मदत गोळा करून आपत्तीग्रस्त लोकांच्या मदतीस पुढे येत आहे,” अशी माहिती जे.जे.हॉस्पिटल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश तांबे यांनी दिली.