मुंबई – राज्यात सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेची (fourth wave of Corona)भीती आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाची रुग्णसंख्या (patients increase)ही राज्यात हजाराचा टप्पा ओलांडते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मास्कसक्तीच्या (compulsion of mask)निर्णयाची शनिवारी घोषणा करण्यात आली, मात्र तरीही सामान्य जनतेवर याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क बंधनकारक करण्यात आलेला असतानाही, त्याकडे सामान्य जनता बेफिकिरीने दुर्लक्ष करताना दिसते आहे. रस्त्यांवर, बसमध्ये, लोकल, रेल्वेत प्रवास करताना, बाजारात अगदी काही मोजकी मंडळी सोडली तर कुणाच्याही तोंडावर मास्क दिसत नाहीये. ही बेफिकिरी अंगाशी य़ेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चौथी लाट वेळीच जनता, प्रशासन आणि सरकारने गांभिर्याने घेण्याची गरज व्यक्त करण्यात येते आहे. अनावश्यक प्रवास टाळण्याचीही गरज आहे.
देशात गेल्या काही दिवसांतील कोरोनाची रुग्णसंख्या धडकी भरवणारी आहे. गेल्या २४ तासांत देशात ४,२७० कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. तीन महिन्यांत भारतात पहिल्यांदाच ४ हाजरांहून जास्त रुग्णसंख्या पोहचली आहे. राज्यातही शनिवारी हजाराहून जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या महिन्यांतील पहिल्या ४ दिवसांतील रुग्णसंख्येने मे महिन्यातील रुग्णसंख्या मागे टाकल्याचे सांगण्यात येते आहे. राज्यात ६० टक्के रुग्ण हे मुंबई शहरातील आणि उपनगरातील आहेत. त्याखालोखाल नवी मुंबई, ठाणे, पुणे येथील रुग्णसंख्या वाढते आहे. राजकीय नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण होते आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. सामान्य जनतेने हे गांभिर्य समजून घेण्याची आवश्यकता आहे.
देशातील कोरोना वाढत असलेल्या पाच राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे. केंद्र सरकारनेही याबाबतचा गांभिर्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री टास्कफोर्स यांची याबाबतची महत्त्वाची बैठकही पार पडली, त्यानंतर शनिवारी राज्यात मास्कसक्तीची घोषणा करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात जमिनीवर मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसते आहे. रेल्वे, पोलीस, वाहतूक पोलीस यांच्याकडून ही सक्ती गांभिर्याने पाळली जाते आहे की नाही, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रशासन, सरकार आणि जनतेला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सगळ्यांनी नियमांचे पलन करत मास्कसक्तीची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.