मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या बंडानंतर शिवसेनेतील ३९ आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर १२ खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. या सगळ्या काळात शिवसेना संघटन बळकट करण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)हे सध्या राज्याचा दौरा करीत आहे. शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांनी गेल्या दोन दिवसांत मराठवाड्याला भेट दिली. यावेळी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात त्यांनी शिवसैनिकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवादही साधला. त्यांच्या या दौऱ्यावरुन जोरदार राजकारणही रंगले. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबेल आणि नवीन शिवसैनिक नेते शिवसेनेत दाखल होतील, असे मानले जात होते. प्रत्यक्षात मात्र पैठण तालुक्यातील अनेक गावांच्या सरपंच, उपसरपंच आणि कार्यकारिणींनी पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. संदिपान भुमरे हे ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय होते, त्यांना उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात स्थानही मिळाले होते. त्यानंतरही त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत बंड केले आहे. आता पैठण तालुक्यातील अनेक गावांनी भुमरे यांना पाठिंबा दिल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
संदिपान भुमरे यांना पाठिंबा देण्यासाठी, दोन गावातील सरपंच व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क मुंबई गाठली आहे. पाडली गावातील सरपंच-सखाराम पाटील वाघ,सरपंच- राम पा.बांडे ,अशोक नागे त्याच प्रमाणे पंचायत समिती सभापती भाऊसाहेब, पंचायत समिती सदस्य बादाडे, भगवान कारके, सुनिल तांबे पाटील व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी आपला पाठिंबा देत शिंदे गटात सामील झाले आहेत. भुमरे यांच्या नेतृत्वातच तालुक्याचा विकास होईल, अशी या सगळ्यांची धारणा आहे.
दरम्यान पैठणमध्ये झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या रॅलीनंतर संदिपान भुमरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी हाच दौरा तीन वर्षांपूर्वी केला असता, तर त्याचा फायदा झाला असता असे त्यांनी सांगितले. सत्तेत असताना अनेकदा सांगूनही पैठणसाठी बैठकही घेण्यात आली असल्याचे भुमरे यांनी सांगितले. गद्दार या केलेल्या टीकेलाही उत्तर देत आपण शिवसेना सोडली नसल्याचे सांगत गद्दार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या रॅलीला आलेले सगळे नागरिक हे आपलेच शिवसैनिक आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंचा दौरा हा झंझावात नव्हता, आता एकनाथ शिंदे जेव्हा राज्यात फिरतील तेव्हा आपल्याला खरा झंझावात पाहायला मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भावनिक सभा घेऊन काही होत नसते, जनता, मतदारांसाठी प्रत्यक्ष काम करावे लागते, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. संजय राऊत काय म्हणतात याला महत्त्व नाही, असे सांगत त्यांनी राऊत यांच्यावरही टीका केली आहे.