किरण तारे, न्यूज 9 , मुंबई : ‘मेट्रो २ अ’वरील गुंदवली ते गोरेगाव पूर्व आणि मेट्रो ७ वरील अंधेरी पश्चिम ते वळनई या दोन नवीन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. त्याचा फायदा लाखो मुंबईकरांना होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास न्यूज 9 प्लसशी संवाद साधताना सांगितले की, सर्व 14 मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई शहर पूर्णपणे वेगळे दिसणार आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. शहर वाहतुकीचे नियोजन केले गेले आहे. यासंदर्भात बोलताना श्रीनिवास यांनी सांगितले की, “सर्व 14 मेट्रो मार्ग सुरु झाल्यावर लोकांना हवे तिथे वेळेवर पोहोचता येईल. मुंबई शहरासाठी हे मोठे परिवर्तन ठरणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार, रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी होणार आणि पर्यावरणाचाही फायदा होणार आहे. एकदा सर्व 14 मेट्रो मार्ग सुरु झाल्यावर आम्हाला सार्वजनिक वाहतुकीत मोठ्या बदलाची अपेक्षा आहे. प्रदूषणाची पातळी खूपच कमी झालेली असेल.”
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक
MMRDA रायगडमधील शिवडी आणि न्हावा-शेवा दरम्यान 22 किमी लांबीचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) पुल बांधत आहे. हा भारतातील सर्वात लांब सागरी पुल आहे. या पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा पुल पुर्ण झाल्यावर काय बदल होणार? यासंदर्भात श्रीनिवास म्हणाले, “या प्रकल्पामुळे एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखे होणार आहे. देशात हे तंत्रज्ञान यापुर्वी कधीही वापरले गेले नव्हते. यामुळे हा क्रांतीकारक टप्पा ठरणार आहे. मुंबई हे बेटांचे शहर आहे. यामुळे त्याचा विस्तार होऊ शकत नाही. या मर्यादा लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले जात आहे. MTHLपुलामुळे भविष्यात तुम्ही 10 ते 12 मिनिटांत सागरी मार्गावरुन मुख्य जमिनीवर पोहोचू शकता. या सर्वांचा परिणाम आर्थिक विकासावर होणार आहे. मुंबई हे उत्तर-दक्षिण शहर आहे. पण ते बदलेल. ते पूर्व-पश्चिम होईल. नवी मुंबई हे मुंबईला पर्याय म्हणून विकसित केले गेले होते. पण दुर्दैवाने ते मुंबईचे वसतिगृह बनले. आता MTHLमुळे मुंबई 3.0 चे स्पप्न फार लांब नाही,” असे श्रीनिवास म्हणाले.
निरंजन हिरानंदानी
हिरानंदानी समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी यांनीही मुंबईच्या होणाऱ्या विकासावर भाष्य केले. ते म्हणाले की, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेमार्ग गेल्या 60-70 वर्षांपासून 119 किलो मीटरचा होता. आम्ही आता पुढील पाच वर्षांत 10 मार्गांवर 330 किलोमीटर मेट्रो मार्ग करत आहोत. तसेच MTHL आणि कोस्टल रोडचा मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. मुंबईत सुरु असणारे हे प्रकल्प एकत्र केल्यास त्यांचे बजेट तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. स्वातंत्र्याच्या गेल्या 60 वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईतील पायाभूत सुविधांवर 33 हजार कोटी रुपये खर्च केले आहे. पुढील पाच वर्षांत ते तीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहेत. यावरुन मुंबईत किती बदल होणार? हे लक्षात येते. मुंबईच्या विस्ताराचे पुढचे केंद्र पनवेल आहे. त्याठिकाणी नवीन विमानतळ येत आहे. दक्षिण मुंबईपासून फक्त एका तासात तुम्ही पनवेल-कर्जतला पोहचू शकतात.
हाफीज कॉन्ट्रॅक्टर
प्रख्यात वास्तूकार हफीज कॉन्ट्रॅक्टर म्हणाले की, मुंबईचा विचार आम्हाला वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. हे एक बेटांचे शहर आहे. समुद्र किनाऱ्यावरील शहर आहे. येत्या दोन वर्षांत येथील जलस्तर दोन मीटरने वाढू शकतो. जेव्हा आम्ही यापद्धतीने विकास करतो तेव्हा हा धोकाही लक्षात घेतला पाहिजे. समुद्रावर रस्ता तयार करताना आम्हाला या गोष्टींचाही विचार करायला हवा. या ठिकाणी हिरवेगार वने हवीत. तसेच समुद्राच्या किनाऱ्यांची जागा उंच करुन टाकायला हवी. यामुळे जलस्तर वाढला तरी धोका निर्माण होणार नाही.
हिरवेगार शहर राहूनच गेले
“स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्ही शहरात कोणतीही हिरवीगार जागा जोडलेली नाही. हा कोस्टल रोड वर्सोव्यापर्यंत उजवीकडे जाईल आणि त्यानंतर पूर्वेकडील फ्रीवे होणार आहे. हा रस्ता एक संपूर्ण रिंग तयार करेल.पुर्व आणि पश्चिमेकडील रस्ते सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत जोडलेला असल्याने ते एक संपूर्ण रिंगरोड तयार होईल. येत्या 30-40 वर्षांनंतर जनता तुम्हाला त्यासाठी आशीर्वाद देईल,” असेही हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितले.
सोमनाथ मुखर्जी
एएसके वेल्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ मुखर्जी यांनी शहरातील सॉफ्टवेअर पायाभूत सुविधांच्या बाबतीत आपले मत मांडले. ते म्हणाले, “आम्हाला सातत्याने भौतिक पायाभूत सुविधांसह सॉफ्टवेअर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत राहावे लागेल. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, परंतु तिचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी आणि जागतिक प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी स्वतःला सतत अपग्रेड करणे आवश्यक आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र का नाही? मुंबईत लवाद केंद्र का नाही? ज्या कंपन्या चीनसोडून येत आहे, त्यांच्यांसाठी मुंबई चांगली संधी आहे. संभाव्य जागतिक प्रतिभेलाही शहराकडे आकर्षित करत करण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवे,” मुखर्जी म्हणाले.