राज्याचे होणारे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते सहभागी होणार की नाहीत याबाबत सस्पेंस आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार की नाहीत याचा निर्णय थोड्याच वेळात होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसोबत बैठक घेतली. मंत्रीमंडळातील सहभागाबाबत संध्याकाळीपर्यंत निर्णय घेऊ असं शिंदे म्हणाले होते. त्यानंतर आता फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले आहेत.
एकनाथ शिंदे यांना गृह खाते मिळावे म्हणून शिवसेनेची मागणी आहे. पण भाजप हे खातं सोडण्यास तयार नाहीत. आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यंत्री असताना त्यांना गृहखाते आपल्याकडे ठेवले होते. त्यामुळे आता शिंदे हे उपमुख्यमंत्री होत असल्याने त्यांना देखील हे खातं मिळावं अशी शिवसेनेची मागणी आहे.
महायुतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरला असला तरी खातेवाटप अजून झालेले नाही. आता फडणवीस हे शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून होत आहे. एकनाथ शिंदे यांना गृहखातं न देता त्यांना इतर दोन महत्त्वाची खाती दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात पुढचं सरकार स्थापन होणार आहे. शपथविधीसाठी फक्त काही तास उरले आहेत. पण एकनाथ शिंदे यांचा निर्णय अजून जाहीर झालेला नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी अपेक्षा भाजपकडून व्यक्ती केली जात आहे.