राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन, 15 कोटींच्या खंडणीची मागणी

| Updated on: Nov 04, 2023 | 11:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याने फोन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तोतया ईडी अधिकाऱ्याने भोसलेंना ईडी गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी खंडणीची मागणी केली.

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन, 15 कोटींच्या खंडणीची मागणी
Follow us on

कृष्णा सोनारवाडकर, Tv9 मराठी, मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याने फोन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तोतया ईडी अधिकाऱ्याने भोसलेंना ईडी गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी खंडणीची मागणी केली. या तोतया अधिकाऱ्याने अनिल भोसलेंना ईडीच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 15 कोटींची मागणी केली. या प्रकरणी अनिल भोसले यांच्या पत्नी रश्मी भोसले यांच्या तक्रारीनुसार वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अनिल भोसले हे सध्या अटकेत आहेत. त्यांना ईडीने शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरणात अटक केली होती. वरळी पोलिसांनी या बनावट ईडी अधिकाऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

अनिल भोसले यांच्यावर 70 कोटी 78 लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. शिवाजीरावर भोसले सहकारी बँकेत हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीकडून तपास सुरु आहे. ईडीने मार्च 2021 मध्ये अनिल भोसले यांना घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी अटक केली होती. त्यांना अटक करण्याआधी 2016 पासून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत होता.

रिझर्व्ह बँकेकडून कारवाई

या प्रकरणी खुद्द रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले बँकेच्या संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले बँकेवर प्रशासक नेमण्याचा आदेश दिला होता. विशेष म्हणजे या घोटाळ्याची व्याप्ती चक्क 300 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा केला जात होता. तसेच 222 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवरही निर्बंध घालण्यात आले होते. याप्रकरणी ईडीकडून पुढील तपास सुरु आहे.