वसई (ठाणे) : पाऊस कमी झाल्याने शेत-शिवार करपू लागलंय. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर पूर्णपणे करपून गेली आहेत. पेरणीसाठी टाकलेले पैसेही पाण्यात गेले आणि शेवटी कर्ज वाढत आहे. हाताला काम मिळत नसल्याने परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, कामगार रोजगारासाठी मुंबईच्या दिशेने स्थलांतर करु लागले आहेत. वसई-विरारमध्ये असे 50 हून अधिक शेतकरी जोडपे दाखल झाले आहेत.
परभणीच्या जिंतूर ताल्युक्यातील, हिंगोलीमधील जवळाबाजार, गणेशपूर, गोंडल, जाम्ब, वटकली, नांदेडमधील हातागाव ताल्युक्यातील म्हाताला, न्यूघा, चक्री, मुतखेड डोनगाव-गोपालवादी, पिंपळ-कुटा गोपाळवाडी, दरेगाव वाडी, या ठिकाणच्या 35 ते 40 शेतकरी जोडपे वसई, विरार, नालासोपारा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी रोजगाराच्या शोधात आल्या आहेत.
नालासोपाऱ्यात आचोले तलाव, आचोले गाव, संतोष भुवन, निळेगाव, अग्रवाल, आंबेडकर नगर याठिकाणी रुम भाड्याने घेऊन राहतात. याठिकाणी कामाच्या शोधात आलेत. पण इथे सुद्धा वेळेवर काम मिळत नसल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विरारमध्ये मजुरीचे सध्या काम करणाऱ्या जनाबाई मोरे या परभणीच्या जिंतूर ताल्युक्यातील एका तांड्यावरच्या त्या रहिवाशी आहेत. जिंतूरमध्ये साडेपाच एकर शेती आहे. पती 15 वी पर्यत शिकलेले आहेत. पण यंदाच्या वर्षी पाऊस नसल्याने त्याची शेती पूर्णपणे निकामी झाली, गावात रोजगार नाही, शेतात पेरलेले धान्याही हाताला लागले नाही. त्यामुळे त्या आपले पोट भरण्यासाठी गाव सोडून आपल्या पतीसह नालासोपाऱ्यात रोजगारासाठी आल्या आहेत. या परिसरात हाताला लागेल ते काम करून आपली उपजीविका भागवतात. नालासोपारा येथे रुम भाड्याने घेऊन राहतात. पण इथेही वेळेवर काम मिळत नसल्याने रोजगाराचा प्रश्न असल्याचे त्या सांगतात.
शेतकऱ्यांचं स्थलांतर म्हणजे दुष्काळाची भीषणता दाखवणारं चित्र आहे. हे आता तरी सरकारला दिसणार का, हा प्रश्न आहे.