मुंबई : सुमारे 152 वर्षे जुन्या वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागाचे सुशोभिकरण काम सुरु असतानाच पुन्हा फेरिवाल्यांनी स्थानकाला वेढा घातलाय. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पालिकाअधिऱ्यांसह या ठिकाणाचा पाहणी दौरा केला. याबाबत लवकरच पालिका, अधिकृत फेरिवाले, रिक्षा आणि रेल्वे याची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला नवी झळाळी देण्यात आली आहे. वांद्रे स्थानक उपनगरीय मार्गावरील आकर्षक स्थानक असल्याने या स्थानकाला ‘उपनगरीय राणी’ असे संबोधले जाते. सुमारे 152 वर्षांपेक्षा जुन्या हेरिटेज ए-वन दर्जा असलेल्या वांद्रे स्थानकाला नवीन साज देण्यात येत असतानाच रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील भागाचे सुशोभिकरण करण्यात यावे यासाठी स्थानिक आमदार म्हणून भाजपा नेते अॅड अशिष शेलार यांनी पाठपुरावा सुरु केला. रेल्वे, पालिका जागेच्या हद्दीचे वाद, फेरिवाल्यांनी घातलेला वेढा, त्यामुळे अपुरी जागा, त्याच ठिकाणी असलेला बस स्टॉप, रिक्षा स्टँड या सर्व विषयांवर मार्ग काढत या सुशोभिकरणाचा प्लॅन तयार करण्यात आला. त्यासाठी अनधिकृत फेरिवाल्यांवर मोठ्याप्रमाणात कारवाई करण्यात आली. ती लढाई न्यायालयापर्यंत गेली. त्यातून मार्ग काढून 2019 ला कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
कोरोनाकाळात कामात शिथिलता येताच पुन्हा फेरिवाल्यांनी हळूहळू अतिक्रमण सुरु केले असून रिक्षा आणि बस यामुळे स्थानकातून बाहेर पडणे पुन्हा त्रासाचे झाले आहे. त्यातच रेल्वे आपल्या हद्दीत पादचारी पुलाचे काम करीत असून त्या कामातील भंगारचे गोडाऊन याच परिसरात बांधण्यात आले आहे. तर एकच मार्ग स्थानकात जाण्यास उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने आज आमदार आशिष शेलार यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त मसूरकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका स्वप्ना म्हात्रे याही उपस्थितीत होत्या.
दरम्यान प्राप्त परिस्थिती पाहिल्यानंतर परवानाधारक फेरिवाले, रिक्षा युनियनचे प्रतिनिधी, बेस्टचे अधिकारी आणि रेल्वे, महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत मार्ग काढण्याचे आज निश्चित करण्यात आले. तसेच सुशोभिकरणासाठी मोकळ्या केलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण केलेल्या अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करण्याचे निश्चित करुन कामाला वेग देण्याच्या सूचना आमदार अॅड आशिष शेलार यांनी यावेळी केल्या.
इतर बातम्या :
अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस, ‘जाहीरपणे माफी मागा, नाहीतर…’
(feriwala creating trouble in bandra railway station premises bjp leader ashish shelar visited bandra station)