सुनील जाधव, डोंबिवली : डोंबिवली मानपाडा येथे डोंबिवली पूर्व भाजप मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर भाजप कार्यकर्ते अन् पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. मग कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
काय आहे प्रकरण
डोंबिवली पूर्व भाजप मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यांविरोधात एका महिलेकडे घर खाली करण्याची धमकी देत शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
जोशी यांनी आरोप फेटाळले
महिलेने केलेले आरोप नंदू जोशी यांनी फेटाळले. त्यांनी म्हटले की, तक्रार करणारी महिला माझ्या मित्राची पत्नी आहे. दोघांमध्ये वाद सुरु आहेत. मी मित्राला मदत करतो, असे त्यांना वाटते. त्या रागातून त्यांनी माझ्याविरोधात तक्रार केली आहे. मी आतापर्यंत कधीही त्या महिलेला फोनही केलेला नाही. संदेश पाठवलेला नाही. कधी समोरही बोललो नाही. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी माझी आहे.
पीआय शेखर बागडे यांच्यांवर रोष
मानपाडा पोलीस ठाण्याचे सीनियर पीआय शेखर बागडे हे भाजपच्या कार्यकर्त्यांना मदत करत नाही, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. बागडे यांनी नंदू जोशी यांच्यांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेत आंदोलन केले होते. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्याचे सीनियर पीआय शेखर बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.
बदलीची मागणी
बागडे यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी करत गुरुवारी पुन्हा एकदा भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील सर्व पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी कल्याणपूर्वमध्ये झालेल्या बैठकीत घोषणा दिल्या. या बैठकीत आधी शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जोपर्यंत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होणार नाही, तोपर्यंत शिवसेना शिंदे गटाला सहकार्य करणार नाही, असा ठराव करण्यात आला. यावेळी बैठकीत उपस्थित असलेले कॅबिनेट मंत्री आमदार रवी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. हा विषय आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांकडे काढू, असे आश्वासन दिले.