मोठी बातमी! मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकाला भीषण आग, प्रवाशांची धावपळ

| Updated on: Dec 13, 2023 | 3:50 PM

मुंबईतीललोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनला आज अचानक दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत रेल्वे स्थानकावरील बुकिंग आणि वेटिंग हॉल जळून खाक झालं आहे. अतिशय मोठी ही आग आहे. आग लागल्यानंतर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली.

मोठी बातमी! मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकाला भीषण आग, प्रवाशांची धावपळ
Follow us on

मुंबई | 13 डिसेंबर 2023 : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकाला आज अचानक दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे दृश्य समोर आले आहेत. हे दृश्य पाहिल्यानंतर आग किती मोठी आहे याची जाणीव होतेय. मिळालेल्या माहितीनुसार, लोटमान्य टिळक टर्मिनस स्थानकात बुकिंग आणि वेटिंग हॉलमध्ये ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीनंतर पोलिसांनी सर्व प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर काढलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शर्थीने सुरु आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली ते समजू शकलेलं नाही. पण सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आग अशी अचानक कशी लागले? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय. पोलीस आणि प्रशासनही या आगीमागील कारण शोधणार आहे. पण सध्या तरी परिस्थिती पूर्ववत करणं हे प्रशासनापुढील महत्त्वाचं आहे.

एलटीटी स्थानक अतिशय महत्त्वाचं

लोकमान्य टिळक टर्मिनस हे मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. या रेल्वे स्थानकाहून लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. तसेच देशातील वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून लाखो प्रवासी या रेल्वे स्थानकावर येत असतात. या रेल्वे स्थानकावर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. लाखो प्रवासी दररोज रेल्वे स्थानकावर ये-जा करतात. अनेक जण इथे वेटिंग रुममध्ये आपल्या ट्रेनची वाट पाहात बसलेली असतात. असं असताना अचानक रेल्वे स्थानकाला आग लागल्याने खळबळ उडाली आहे.

रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु

संसदेत आज अचानक दोन तरुणांनी सभागृहात घुसून धुडगूस घातल्याची बातमी समोर आली. त्यानंतर मुंबईतल्या महत्त्वाच्या अशा लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर आगीची घटना घडली. या घटनांचा एकमेकांशी संबंध नाही. पण या घटनांमधून काही घातपातचा तर डाव नव्हता ना? असा प्रश्न उपस्थित होतोय. रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जातोय. पोलीस तपासातून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.